VIDEO : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हाय हाय, औरंगाबादेत आंदोलन

माधव इतबारे
Wednesday, 18 December 2019

महापालिकेत 25 ते 30 वर्षांपासून शिवसेना-भाजपची युती होती. त्यामुळे दोन्ही पक्ष अडचणीच्या काळात एकमेकांना मदत करण्यासाठी धावून जात. मंगळवारी मात्र भाजप नगरसेवकांनी ठाकरे हाय हाय..., बीन खात्याच्या मुख्यमंत्र्यांचे करायचे काय... पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे..., अशा जोरदार घोषणा देत तासभर आंदोलन केले.

औरंगाबाद - महापालिकेत गेल्या 25 ते 30 वर्षांपासून सत्तेत सोबत असलेले शिवसेना-भाजप पक्ष युती संपुष्टात येताच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरासाठी जाहीर केलेल्या 1,6,80 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता.17) भाजप नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केले.

यावेळी "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हाय हाय... बिन खात्याच्या मुख्यमंत्र्यांचे करायचे काय... अशा जोरदार घोषणा देत नगरसेवकांनी परिसर दणाणून सोडला.  भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी शुक्रवारी (ता.13) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, सोमवारी (ता.16) त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन पुन्हा एकदा राजीनामा दिला. त्यानंतर मंगळवारी सकाळी पाणीपुरवठा योजना रद्द करणाऱ्या राज्य शासनाच्या विरोधात भाजप नगरसेवकांनी जोरदार आंदोलन केले.

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महापालिकेत 25 ते 30 वर्षांपासून शिवसेना-भाजपची युती होती. त्यामुळे दोन्ही पक्ष अडचणीच्या काळात एकमेकांना मदत करण्यासाठी धावून जात. मंगळवारी मात्र भाजप नगरसेवकांनी ठाकरे हाय हाय..., बीन खात्याच्या मुख्यमंत्र्यांचे करायचे काय... पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे..., अशा जोरदार घोषणा देत तासभर आंदोलन केले.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना देखील टार्गेट करण्यात आले. त्यामुळे एवढी वर्षे गळ्यात गळा घालून सत्तेत असणारे आता विरोधात तेही शेवटच्या टोकाला जाऊन घोषणा देत असल्याचे चित्र पाहून अनेकांना धक्का बसला. दरम्यान, भाजप नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांची भेट घेऊन निवेदन दिले. स्थायी समिती सभापती जयश्री कुलकर्णी, गटनेते प्रमोद राठोड, माजी महापौर विजय औताडे, गजानन बारवाल, राजू शिंदे, दिलीप थोरात, कचरू घोडके, राज वानखेडे, शिवाजी दांडगे, रामेश्‍वर भादवे, अप्पासाहेब हिवाळे, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, नगरसेविका तथा महिला शहराध्यक्षा ऍड. माधुरी अदवंत यांच्यासह इतरांनी आंदोलनात सहभाग घेतला. 
हेही वाचा : औरंगाबादचे झाले काश्‍मीर  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protests against Uddhav Thackeray