esakal | Petrol Prices: उस्मानाबादेत पेट्रोल शतकाच्या उंबरठ्यावर तर डिझेल नव्वदीत
sakal

बोलून बातमी शोधा

petrol prices

Petrol Prices: उस्मानाबादेत पेट्रोल शतकाच्या उंबरठ्यावर तर डिझेल नव्वदीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद: कोरोना संकटाने घायाळ झालेल्या नागरिकांना आता पेट्रोल-डिझेल दरवाढीचे (petrol prices) धक्के सहन करावे लागत आहेत. सध्या जिल्ह्यात पेट्रोलचा दर ९९ रुपये ६० पैसे प्रतिलीटर असून, डिझेलच्याही एका लीटरसाठी ८९ रुपये ७९ पैसे मोजावे लागत आहेत. कोरोनाच्या आपत्तीला तोंड देत असताना पेट्रोल-डिझेल दरवाढीचा (diesel price) भडका उडाला आहे. विशेष म्हणजे १० टक्के इथॅनॉल मिसळूनही इंधनाच्या किमती कमी होत नसल्याने सामान्य नागरिक हतबल झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्याच्या इतिहासात रेकॉर्ड तयार होत असून, जिल्ह्यातील पेट्रोलचा दर प्रति लीटर शंभर रुपये गेला नव्हता. अद्यापही ९९ रुपये ६० पैसे दर असून रात्री यामध्ये किती बदल होतो. याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. गेल्या महिन्यात ९८ ते ९९ रुपयांपर्यंत पेट्रोलचे दर गेले होते. मात्र, तेथून पुन्हा दर कमी झाले होते. सध्या जिल्ह्यासह राज्यात आणि देशात कोरोनाच्या आपत्तीने नागरिकांचे अर्थकारण कोलमडले आहे. त्यामध्ये आता पेट्रोल दर वाढही त्याच दिशेने वाटचाल करीत आहे.

हेही वाचा: आजीचं अख्खं कुटुंब कोरोनाबाधित; मदतीला धावला 'देवदूत'

या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठी झळ सहन करावी लागत आहे. पेट्रोलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. कधीही शकत पूर्ण करू शकतात. पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल केंद्र शासनाने परवानगी दिल्याने पेट्रोलमध्ये सध्या दहा टक्के इथेनॉल मिसळले जात आहे. साखर कारखाने इथेनॉलच्या माध्यमातून पैसाही कमावत आहेत. मात्र, कारखानदाराकडून ६० रुपये प्रति लीटरने घेतलेले इथॅनॉल पेट्रोलमध्ये मिसळल्यानंतर पेट्रोलचे दर कमी होतील अशी सामान्य नागरिकांना अपेक्षा होती. पण, इथॅनॉल मिसळले म्हणून दर कमी झाल्याचे कधीच दिसून आले नाही.

प्रति लीटरला २० ते २५ रुपयांचा कर
उस्मानाबाद जिल्ह्याला सोलापूर डेपोमधून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा होतो. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलवर मोठ्या प्रमाणात कर लावला जात आहे. त्यामुळे सामान्य ग्राहक प्रति लीटरमागे २० ते २५ रुपये शासनाला कर म्हणून भरणा करीत आहे. इथॅनॉल मिसळल्यानंतरही दर तेच असतील तर शासनाने लावलेला कर कमी करावा, अशी भावना सामान्य नागरिकांतून येत आहे.

हेही वाचा: बीडमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग वाढवतोय चिंता!

पेट्रोलमध्ये इॅथॅनॉल मिसळले जात आहे. मग त्याचा फायदा सामान्य नागरिकांना कधी होणार आहे. का उगीच कशाचाही बागुलबुवा केला जातो. १० टक्के इथॅनॉल मिसळले तर दहा रुपयांनी दर कमी केले पाहिजेत. त्याशिवाय सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार नाही.
- अमर माळी, ग्राहक.

कोरोनामुळे मोठी भाववाढ झाली आहे. कोणतीही वस्तू खरेदी करताना अव्वाच्या सव्वा पैसे लावले जात आहेत. कोरोना संकटाने आर्थिक कचाट्यात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्याऐवजी पेट्रोल दरवाढीचा झटका दिला जात आहे. शासनाने इंधनावरील कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा.
- सुभाष पाटील, ग्राहक.

आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या किमती ठरतात. नक्की भाव कमी होतील. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किमती कमी होतील, अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी राज्य आणि केंद्राने कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा.
- दत्ता कुलकर्णी, जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशन, उस्मानाबाद.