जगण्याच्या चौकटी मोडणारा लेखक अरविंद : दासू वैद्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

'गोष्ट छोटी डोंगराएवढी' लेखसंग्रहाचे प्रकाशन 

औरंगाबाद - "केवळ मजकूर पूर्ण करायचा आहे म्हणून किंवा रतीब घातल्यासारखे लेखन सध्या सुरू असते; मात्र अरविंद जगताप हे जगण्याची, नाटकाची, विचाराची, शिक्षणाची अशा साऱ्या चौकटी मोडून लिखाण करणारे लेखक आहेत,'' असे उद्‌गार प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांनी काढले. श्री. जगताप लिखित "गोष्ट छोटी डोंगराएवढी' या लेखसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते रविवारी (ता. 15) झाले. 

सरस्वती भुवनच्या नाट्यशास्त्र विभागातर्फे गोविंदभाई श्रॉफ नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. दिलीप घारे, नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. किशोर शिरसाट, गणपतराव जगताप, प्रा. रवींद्र बनसोड, महेश अचिंतलवार उपस्थित होते. 

"सध्या फेसबुकवर लिहिण्याला कमी मूल्य आहे, असे समजले जाते; परंतु लेखकाने उपलब्ध त्या सर्व माध्यमांतून लिहिण्याचा प्रयत्न करायला हवा. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या गोष्टी आशयसमृद्ध आणि मनाला छेदून जाणाऱ्या आहेत. वाटाड्याला वाटा जेव्हा वहिवाटा वाटतात, तेव्हा अशा गोष्टी जन्माला येतात,'' असे दासू वैद्य यावेळी म्हणाले. प्रेषित रुद्रवार आणि अविनाश रावते यांनी जगताप यांच्या पुस्तकातील "किस' आणि "दाजी' या कथांचे अभिवाचन केले. दीपक पवार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला नाट्यप्रेमी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
हुजरेगिरीने प्रगतीला खोडा 
राजकीय नेत्यांची हुजरेगिरी करण्यातही एक पातळी असते; मात्र आजकाल सर्वत्र ही पातळी ओलांडली जात आहे. त्यामुळेच समाजात प्रगतीच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टी घडताना दिसत नाहीत, अशी खंत अरविंद जगताप यांनी व्यक्त केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Publication of Arvind Jagtap's book