भाजी आडतीमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 जानेवारी 2019

- दगडफेक, तलवारीचाही वापर
- पोलिसांचा फौजफाटा आल्यानंतर निवळला तणाव
- शेतकऱ्यांना चोहेबाजूने त्रास

बीड : खासबागजवळील आडत मार्केटमध्ये दोन गटांत दगडफेक आणि तुंबळ हाणामारीनंतर तणाव निर्माण झाला. यामध्ये तलवारीचाही वापर करण्यात आल्याची घटना मंगळवारी (ता. आठ) सकाळी घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरुन पेठ बीड पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा फौजफाटा दाखल झाल्यानंतर येथील तणाव निवळला.

शहरातील खासबाग परिसरात भाजीपाला ठोक विक्रीची आडत आहे. या ठिकाणी व्यापारी आणि शेतकऱ्यांसोबत दादागिरीचे प्रकार नित्याचेच आहेत. एकिकडे व्यापाऱ्यांकडून अनाधिकृत कमिशन घेण्याने हैराण असलेले शेतकऱ्यांना काही स्थानिक टवाळखोरांच्या त्रासालाही सामोरे जावे लागते. अशीच घटना मंगळवारी घडली असून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याने या भागात तणाव निर्माण झाला. या हाणामारीत शेतकरीही जखमी झाले आहेत.

मंगळवारी सकाळी नियमित आडत व्यापार सुरु झाल्यानंतर सममान खान गफार खान तिथे आल्यानंतर त्याचे मोहम्मद शफीक याच्यासोबत भांडण सुरु झाले. यानंतर दोन्ही गट आमने सामाने आले. दगडफेकीनंतर तरुणांनी हातात तलवारी घेऊन येऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या ठिकाणी तणावासह भितीचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पगार हे दंगल नियंत्रण पथक व पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी टवाळखोरांना चांगलाच चोप देऊन ताब्यात घेतले. दरम्यान, प्रतिष्ठितांनी मध्यस्थी केल्यानंतर आणि पोलिसांनी टवाळखोरांना ताब्यात घेतल्यानंतर हा तणाव निवळला. या प्रकरणी पेठ बीड पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादीवरुन मोहम्मद शफीक जाफर, शेख जुनेद शेख शहाबोद्दीन, शेख जाजोद्दीन शेख बागवान, गफार खान आबाज खान, सलमानखान गफार खान यांच्यासह इतर दोघांवर गुन्हे नोंद करण्यात आले. घटनेत चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तलवार जप्त केली आहे.

शेतकऱ्यांना चोहेबाजूने त्रास
दरम्यान, या भागातील काही टवाळखोरांचा शेतकऱ्यांना नेहमीचाच त्रास आहे. तसेच, शासनाने शेतकऱ्यांकडून आडत घेऊ नये असा निर्णय घेतलेला असतानाही व्यापाऱ्यांकडून सर्रास आडत घेतली जाते. या ठिकाणी भाजी, फळे आणणाऱ्या वाहनचालकांकडून हप्ते वसूलीचे प्रकारही नित्याचेच आहेत.

Web Title: Quarrel in two groups in Beed market