आचारसंहितेचा भंग झाल्यास त्वरित कठोर कारवाई करा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

परभणी - कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता आला पाहिजे. यासाठी निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याकरिता लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणेच प्रशासनाने दक्षता घ्यावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास त्वरित कठोर कारवाई करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिले. 

परभणी येथे शनिवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारी विभागीय आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले. 
सहारिया म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असून निवडणुकीदरम्यान आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी भर द्यावा. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कोणत्याही स्वरूपाची माहिती देणे अथवा काही तक्रारी मांडणे यासाठी नियंत्रण कक्ष चोवीस तास सतत कार्यरत ठेवावे. निवडणूक संदर्भातील कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही सहारिया यांनी सांगितले. 

सहारिया म्हणाले की, मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणावर मतदार जनजागृतीबाबत मोहीम हाती घेण्यात आली आहे. मतदार जागृतीमध्ये प्रामुख्याने मतदानाचे प्रमाण वाढविण्याबरोबरच वस्तू अथवा पैशाच्या स्वरूपातील प्रलोभनाला तसेच दारू वाटपाला आळा घालणे, याबाबतदेखील जागृती करण्यात येत आहे. मतदारांच्या सोईसाठी मतपत्रिकेवरील अक्षरांचा आकार वाढविण्यात आला असून त्यामुळे ते वाचनास सोपे होईल, असेही सहारिया यांनी सांगितले.

Web Title: Quick action in the event of breach of the code of conduct to strict