मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ इच्छित नाही! : रा. रं. बोराडे

संकेत कुलकर्णी
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

आजवर बहुतांश अध्यक्ष फक्त "तीन दिवसांचे गणपती' बनून वावरले. ऐन उमेदीच्या काळात हा मान मिळाला असता, तर मी ते काम केले असते. आता मात्र मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ इच्छित नाही,' असे पत्रकच ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रा. रं. बोराडे यांनी प्रसिद्ध केले आहे. 

औरंगाबाद : "साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांनी वर्षभराच्या कार्यकाळात मराठी भाषा आणि साहित्याच्या अभिवृद्धीसाठी प्रयत्न करणे अपेक्षित असते. मात्र आजवर बहुतांश अध्यक्ष फक्त "तीन दिवसांचे गणपती' बनून वावरले. ऐन उमेदीच्या काळात हा मान मिळाला असता, तर मी ते काम केले असते. आता मात्र मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ इच्छित नाही,' असे पत्रकच ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रा. रं. बोराडे यांनी प्रसिद्ध केले आहे. 

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष राहिलेल्या प्रा. बोराडे यांना साहित्यविश्‍वात मानाचे स्थान आहे. उस्मानाबाद येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सोशल मिडीयावर, तसेच इतर माध्यमांतून त्यांचे नाव चर्चिले जात होते. सौम्य आणि प्रेमळ प्रकृतीचे भासणाऱ्या, पण तितक्‍याच तत्त्वनिष्ठ आणि करारी प्रवृत्तीच्या प्रा. बोराडे यांनी मात्र या चर्चांना स्वतःच पूर्णविराम दिला आहे. गुरुवारी (ता. 1) प्रसिद्ध केलेल्या पत्रात त्यांनी म्हटले, "साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांतून संभाव्य नावे चर्चिली जात आहेत त्यात माझं एक नाव आहे. या संदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो, की साहित्य संमेलन तीन दिवसांचे असले तरी अध्यक्षाचा कार्यकाळ एक वर्षाचा असतो. या कार्यकाळात त्या अध्यक्षाने मराठी भाषा व मराठी साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी प्रयत्न करणे अपेक्षित असते. मात्र मोजक्‍याच अध्यक्षांनी यापूर्वी हे कार्य केले आहे.'' 

ऐन उमेदीच्या वयात मला हा सन्मान प्रदान झाला असता, तर हे कार्य मी माझ्या कुवतीनुसार निश्‍चित चांगले केले असते. पण वयोमानानुसार ती उमेद राहिलेली नाही. त्यामुळे उस्मानाबाद येथे आयोजित होत असलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचा मी अध्यक्ष होऊ इच्छित नाही. इतकेच नव्हे, तर तहहयात मला हा सन्मान स्वीकारणे शक्‍य होईल असे वाटत नाही, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली आहे. 

"उस्मानाबाद ही माझी सासुरवाडी आहे. माझ्या ठिकाणी एखादा कुणी असता, तर सासुरवाडीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी, यासाठी धावाधाव केली असती. पण अशा गोष्टी आपणच थांबवल्या पाहिजेत,'' अशा मिश्‍किल शब्दांत प्रा. बोराडे यांनी हा मान नाकारत असल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: R R Borade says i dont want to be a president of Sahitya Sammelan