नांदेडात उत्पादन शुल्क विभागाचे छापे

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर या विभागाचे जिल्हा अधिक्षक नितीन सांगडे यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी व गुन्हेगारांना प्रतिबंधीत करण्यासाठी विशेष पथकाची नेमणुक केली.

नांदेड : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात ४० आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून देशी दारु, हातभट्टी, ताडी, रसायनसह वाहने असा साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १४ ते १५ आॅगस्टच्या दरम्यान करण्यात आली. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर या विभागाचे जिल्हा अधिक्षक नितीन सांगडे यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी व गुन्हेगारांना प्रतिबंधीत करण्यासाठी विशेष पथकाची नेमणुक केली. या पथकांनी जिल्ह्यातील किनवट, नांदेड, सिडको, हियामतनगर, कुंडलवाडी, धर्माबाद, बिलोली, उमरी, बोधडी माहूर आदी भागात छापे टाकले. यावेळी पथकांनी ४० आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून आठ लाख ५३ हजार २८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ज्यात १५० लीटर देशी दारु, २०० लीटर हातभट्टी, ५४० लीटर ताडी, १२०० लीटर रसायन यासह पाच दुचाकी, एक ॲटो आणि एक चारचाकी वाहन जप्त केले.

या छापा सत्रामुळे अवैध धंदे चालकांत घबराट पसरली आहे. या कारवाईत निरीक्षक एस. एस. खंडेराय, श्री. चिलवंतकर, दुय्यम निरीक्षक टी. बी. थेख, के. आर. वाघमारे, अरविंद जाधव, आर. बी. फालके यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या पथकांचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे आणि अधिक्षक निलेश सांगडे यांनी अभिनंदन केले.     

Web Title: Raid of Department of Excise Duty in Nanded

टॅग्स