अर्धापूरच्या जुगार अड्ड्यावर छापा, १९ जुगाऱ्यांवर गुन्हा 

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 19 मार्च 2020

पोलिसांनी या अड्ड्यावरुन चार दुचाकी, साडेआठ हजार रुपये नगदी असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास केली.

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील मालेगाव शिवारातील एका झन्ना- मन्ना जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करून १९ जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या अड्ड्यावरुन चार दुचाकी, साडेआठ हजार रुपये नगदी असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास केली. 

जिल्ह्यातील मटका, जुगार अशा प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचा चंग पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी बांधला आहे. मात्र स्थानिक पोलिस निरीक्षक या अवैध धंद्यावाल्यांना प्रोत्साहन देत असल्याचे अशा मोठ्या कारवाईवरुन स्पष्ट होत आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांनीही आपल्या विभागात अशा प्रकारचे अवैध चालणार नाहीत याची काळजी घ्यावी अशा सुचना ठाणेदारांना दिल्या आहेत. अर्धापूर तालुक्यात जुगार व मटका नेहमीच जोमाने चालतो.

 हेही वाचा तीनशे रुपयांसाठी युवकाचा खून!

भोकर फाटा व मालेगाव हा परिसर तर मटका व जुगारांसाठी प्रसिद्ध आहे. मालेगाव परिसरातील काही शेतांच्या आखाड्यावर हे अवैध धंदे चालतात. मालेगाव चौकीवर नेमणुकीस असलेल्या पोलिसांना ही माहिती नसणे म्हणजे दुर्दैव असल्याचे बोलल्या जाते. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या आदेशावरुन स्थानिक पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या एका पथकाला अर्धापूर तालुक्यात मटका व जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी तैणात केले.
 
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

या पथकाने गुप्त माहित काढून मालेगाव परिसरातील संदीप जनार्धन अटकोरे यांच्या शेतालगत राजरोसपणे चालणाऱ्या झन्ना- मन्ना जुगारावर छापा टाकला. यावेळी पोलिस दिसताच काही जुगारी पसार झाले. मात्र पोलिसांनी अड्ड्यावरील शशिकांत मुरलीधर अटकोरे, गुलाब महादु दवणे, शेख महेबुब शेख अमीन, सचीन कचरु कुंटे, राजकुमार देवराव नादरे, दीपक उत्तम नादरे कैलास कुंटे यांना अटक केली. अड्ड्यावरून एमएच२६-एजे-६१२६, एमएच३८-ए-३९१६, एमएच३८-क्यु-१६३८ या दुचाकी मालकांसह १९ जणांवर मुंबई जुगार कायद्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार दशरथ जांभळीकर यांंच्या फिर्यादीवरुन अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्री. देशपांडे करत आहेत. 

येथे क्लिक करा - नांदेड विभागातील काही रेल्वे रद्द

अर्धापूर पोलिस अनभिज्ञ

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सुचना असतांना आपल्या हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे बंद करणे तर सोडाच उलट आखाड्यावर चालणाऱ्या जुगारासारख्या धंद्याकडे दुर्लक्ष करणे अर्धापूर पोलिसांनी महागात पडणार असल्याचे बोलल्या जात आहे. पोलिस अधीक्षक या प्रकरणी काय कारवाई करणार हे येणारा काळच ठरवेल.
       


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raid on gambling base in Ardapur, crime on 19 gamblers nanded news.