esakal | लातूर जिल्ह्यात जुगार अड्ड्यावर छापा; नऊ जणांना अटक, आठ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

0Crimenews_13

दापका (ता.निलंगा) येथील शिवारात निलंगा ते लांबोटा रस्त्यावर एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांना अटक केली आहे.

लातूर जिल्ह्यात जुगार अड्ड्यावर छापा; नऊ जणांना अटक, आठ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त

sakal_logo
By
हरि तुगावकर

लातूर : दापका (ता.निलंगा) येथील शिवारात निलंगा ते लांबोटा रस्त्यावर एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांना अटक केली आहे. यात पोलिसांनी आठ लाख ६७ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अवैध धंद्यावर आळा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी एका विशेष पथकाची नियुक्तीही केली आहे. या विशेष पथकाने दापका शिवारात निलंगा ते लांबोटा जाणाऱ्या रस्त्यावर वसंतराव पाटील यांच्या मालकीच्या शेतात गट नंबर ७६ अ मधील लिंबाच्या झाडाखाली काही लोक पत्त्यावर पैसे लावून तिर्रट जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

रविवारी (ता.२७) पोलिसांनी येथे छापा टाकला. यात बालाजी वसंतराव पाटील (वय ४६, रा. गांधीनगर, निलंगा), अरविंद बाबूराव रणदिवे (वय ७०, रा. लांबोटा), अनिल अच्युतराव पाटील (रा. औंढा), पद्माकर वामन पांचाळ (वय ४५, रा. पांचाळ कॉलनी, निलंगा), प्रदीप रुपगीर गिरी (वय ४४, रा. पांचाळ कॉलनी, निलंगा), शिरीष महादेव स्वामी (वय ४८, रा. दत्तनगर निलंगा), विक्रम सुभाष मोहोळकर (वय ४२, रा.कुंभार गल्ली, निलंगा), विजय व्यंकट जाधव (वय २५, रा. सास्तूर माकणी), गौस इलाही शेख (वय ३५, रा. शिवाजीनगर निलंगा) यांना पोलिसांनी अटक केली. यात दहा जण फरार झाले. पोलिसांनी या छाप्यात २१ हजार १०० रुपये रोख, १६ दुचाकी, एक चार चाकी वाहन, विविध कंपन्यांचे मोबाईल असा एकूण आठ लाख ६७ हजार शंभर रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.लातुरात तिघांना अटक
लातूर शहरातही विशेष पथकाने दोन ठिकाणी मटक्यावर छापा टाकला. यात तिघांना अटक करून ३५ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. येथील कन्हेरी चौकात गंगाराम किशन राठोड (वय ३८, रा.माताजीनगर) हा स्वतःच्या फायद्यासाठी लोकाकडून पैसे घेऊन आकड्यावर कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आला. यात पोलिसांनी एक हजार २० व साडेसहा हजार रुपयांचा एक मोबाईल असा एकूण सात हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच येथील कव्हा रस्त्यावरील हॉटेल साईराज येथे ब्रह्मनाथ अरुण कदम (वय ३२, रा. माताजीनगर), विष्णू मल्हारी मिसाळ (वय २८, रा.साईरोड) हे स्वतःच्या फायद्यासाठी  लोकाकडून पैसे घेऊन मटका खेळत होते. यात पोलिसांनी दोन हजार ९१० रुपये व २५ हजार रुपयांचे मोबाईल असा एकूण २८ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादन - गणेश पिटेकर