रेल्वेसंग्राम सुरू!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

मोठ्या संघर्षानंतर रेल्वे मिळाली... त्यामुळे शैक्षणीक, वैद्यकीय, आर्थिक क्षेत्राच्या वाढीला हातभार लागला...आता हीच रेल्वे बिदरपर्यंत जात आहे. त्यामुळे लातूरकरांवर अन्याय होणार आहे. दुसरीकडे ही रेल्वे बिदरपर्यंत जात असल्याने त्याचा फायदा आम्हाला होत असल्याचे उदगीरकरांचे म्हणणे आहे. या वादामुळे रेल्वेसंग्राम सुरु झाल्यासारखीच स्थिती आहे.

विरोधासाठी लातूरकर आज पुन्हा एकवटणार

मोठ्या संघर्षानंतर रेल्वे मिळाली... त्यामुळे शैक्षणीक, वैद्यकीय, आर्थिक क्षेत्राच्या वाढीला हातभार लागला...आता हीच रेल्वे बिदरपर्यंत जात आहे. त्यामुळे लातूरकरांवर अन्याय होणार आहे. दुसरीकडे ही रेल्वे बिदरपर्यंत जात असल्याने त्याचा फायदा आम्हाला होत असल्याचे उदगीरकरांचे म्हणणे आहे. या वादामुळे रेल्वेसंग्राम सुरु झाल्यासारखीच स्थिती आहे.

विरोधासाठी लातूरकर आज पुन्हा एकवटणार

लातूर - लातूर-मुंबई एक्‍स्प्रेस बिदरपर्यंतच्या विस्तारीकरणाच्या विरोधात शुक्रवारी (ता. ५) लातूर एक्‍स्प्रेस बचाव कृती समितीच्या वतीने बंदचे आयोजन करण्यात आले आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले. 

लातूर- मुंबई एक्‍स्प्रेस  बिदरपर्यंतच्या विस्तारीकरणाला लातूरकरांचा तीव्र विरोध आहे.  दहा वर्षांपासून लातूर एक्‍स्प्रेस फायद्यात आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रवासी मोठ्या संख्येने या रेल्वेने मुंबई व पुण्याला जातात. याच प्रवाशांना जागा मिळत नाही. असे असताना ही रेल्वे बिदरपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या आठवड्यातून तीन वेळेस ही रेल्वे बिदरपर्यंत धावत आहे. या निर्णयामुळे लातूरकरांत तीव्र नाराजी पसरली आहे. हा निर्णय रद्द करावा म्हणून लातूरकर टप्प्याटप्प्याने आंदोलन करीत आहेत.

विस्तारीकरणाचे कारणच काय?
लातूर-मुंबई एक्‍स्प्रेसप्रश्‍नी लातूरकरांच्या भावना तीव्र आहेत. या रेल्वेतून सर्वाधिक प्रवासी लातूरचे असतात. शिवाय ही रेल्वे फायद्यात आहे. तशी रेल्वे प्रशासनाचीच आकडेवारी आहे. त्यामुळे ती बिदरपर्यंत नेण्याचे प्रयोजनच काय, असा संतप्त सवाल लातूरकर विचारत आहेत. मोठ्या प्रतीक्षेनंतर मिळालेली ही रेल्वे बिदरपर्यंत गेल्याने लातूरकरांना जागाच मिळणार नाही. त्याचा परिणाम व्यापारावर होण्याची शक्‍यता आहे. 
शिवाय शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रावरही विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे या रेल्वेच्या विस्तारीकरणाला लातूरकरांचा तीव्र विरोध आहे. यासाठी पुकारलेल्या आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.

काळजी करू नका, लातूर एक्‍स्प्रेसच राहणार - खासदार डॉ. सुनील गायकवाड

लातूर - बिदरपर्यंत विस्तारित केलेली लातूर - मुंबई रेल्वे लातुरातूनच सोडण्याच्या मागणीचे निवेदन खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी दिल्ली येथे गुरुवारी (ता. ४) रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिले. या वेळी श्री. प्रभू यांनी डॉ. गायकवाड यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करीत सदर रेल्वे लातूर - मुंबईच राहणार असल्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती  डॉ. गायकवाड यांनी दिली.

दहा वर्षांपूर्वी सुरू झोलल्या लातूर - मुंबई रेल्वे सेवेला लातूरकरांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सदर रेल्वे क्षमतेपेक्षा दुप्पट, तिपटीने दररोज भरून जाते व येत आहे. सदर रेल्वेचा विस्तार बिदरपर्यंत करण्यात आला आहे. यामुळे लातूरकरांच्या अस्मितेचा प्रश्‍न बनला आहे. रेल्वेच्या बिदरपर्यंत केलेल्या विस्तारीकरणास लातूरकरांचा तीव्र विरोध आहे. ही रेल्वे लातुरातूनच सुरू राहावी, यासाठी कृती समितीची स्थापना करून तीव्र आंदोलन करण्यात आले. याचबरोबर आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे. त्यासाठी उद्या (शुक्रवारी) लातूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

त्याचबरोबर ९ रोजी ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची आज दिल्ली येथे भेट घेऊन लातूर - मुंबई रेल्वेबद्दलच्या लातूरकरांच्या भावना रेल्वेमंत्र्यांच्या कानावर घातल्या. या वेळी त्यांनी सदर रेल्वे आहे तशीच सुरू ठेवून उदगीर, बिदरकरांसाठी बिदर-कुर्ला ही आठवड्यातून एकवेळा धावणारी रेल्वे दररोज करावी, हैद्राबाद - पुणे गाडी दररोज सुरू करण्याच्या मागण्यांचे निवेदन सुरेश प्रभू यांना दिले. 

या वेळी श्री. प्रभू यांनी डॉ. गायकवाड यांची बाजू ऐकत या प्रश्‍नावर सकारात्मक तोडगा काढून लातूरची रेल्वे लातूरहूनच लातूर एक्‍स्प्रेस नावानेच सुटेल, असे आश्‍वासन दिले असल्याची माहिती डॉ. गायकवाड यांनी दिली. या वेळी प्रभू यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून डॉ. गायकवाड यांच्यासमवेत चर्चा केली. यामुळे सदर रेल्वे आता लातूर - मुंबईच राहणार आहे. त्यामुळे लातूरकरांनी आंदोलने करू नयेत, असे आवाहन खासदार डॉ. गायकवाड यांनी केले आहे.

समर्थनार्थ उदगीरकरांचा बंदला मोठा प्रतिसाद

उदगीर - बिदर - मुंबई रेल्वेगाडी नियमित करण्याच्या मागणीसाठी व लातूरकरांच्या विरोधाचा निषेध करण्यासाठी गुरुवारी आयोजित उदगीर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या उदगीर बंदमध्ये सहभाग  नोंदवला. 

उदगीर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने शहरात फेरी काढून सर्वांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. ही फेरी शहरातील उमा चौकातून, मुक्कावार चौक, हनुमान कट्टा, आर्य समाज, सराफ लाईन, चौबारा, कॉर्नर चौक, शहर पोलिस ठाणे, नगरपालिका, शिवाजी चौक देगलूर रोड, कल्पना चौक, शाहू चौक मार्गे शिवाजी चौकार्पंयत काढण्यात आली. बंददरम्यान पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी शहरातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, बस्वराज पाटील नागराळकर, धनाजी कुमठेकर, विजय निटुरे, विक्रांत भोसले, मोतीलाल डोईजोडे, अशोकराव पाटील, शिवराज तोंडचिरकर, रंगा राचुरे, समीर शेख, भरत चामले, उदय मुंडकर, प्रभाकर काळे, ॲड. दत्ता पाटील, बाळासाहेब मरलापल्ले, गणेश भोसले, नाना पाटील, उषा कांबळे, स्वाती वट्टमवार, रामभाऊ मोतीपवळे, रवी हसरगुंडे, दयानंद बिरादार यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी होते.

Web Title: railway issue