रेल्वे रुळांच्या चाव्याच गायब 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - इंदूर-पाटणा रेल्वेचा अपघात ताजा असतानाच नांदेड विभागाच्या औरंगाबाद परिसरात रेल्वे रुळांची व्यवस्थित निगा राखण्यात येत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. रेल्वेस्थानकाच्या परिसरात अनेक रुळांच्या चाव्याच गायब झाल्या आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांना चांगलीच धावपळ करावी लागली. 

औरंगाबाद - इंदूर-पाटणा रेल्वेचा अपघात ताजा असतानाच नांदेड विभागाच्या औरंगाबाद परिसरात रेल्वे रुळांची व्यवस्थित निगा राखण्यात येत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. रेल्वेस्थानकाच्या परिसरात अनेक रुळांच्या चाव्याच गायब झाल्या आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांना चांगलीच धावपळ करावी लागली. 

वर्षभरापासून छोट्या-मोठ्या रेल्वे अपघातांची संख्या वाढली आहे. 20 नोव्हेंबरला इंदूर-पाटणा एक्‍स्प्रेस रेल्वे पटरीवरून घसरली होती. त्यानंतर रेल्वे बोर्डाने सर्व विभागाना रूळ दुरुस्तीचे आदेश दिले होते. दक्षिण मध्य रेल्वे विभागातही सर्वच ठिकाणी रूळ तपासणी झाली. हे होऊनही औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या परिसरात रुळांच्या अनेक ठिकाणच्या चाव्याच गायब झाल्या होत्या. यामुळे अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. 

चिकलठाणा रेल्वेस्टेशनजवळ 25 नोव्हेंबरला दुपारी दीडच्या सुमारास नगरसोल-नरसापूर एक्‍स्प्रेस समोर आलेल्या 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी, रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी घटनास्थळी रवाना झाले. ज्या ठिकाणी हा अपघात झाला होता, तेथे रुग्णवाहिका पोचू शकत नव्हती. त्यामुळे सर्व जण रेल्वे रुळाच्या बाजूने पायी चालले होते. या दरम्यान मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते चिकलठाणादरम्यान रेल्वे रुळाच्या अनेक चाव्या गायब असल्याचे निदर्शनास आले. ही माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आली. अधिकाऱ्यांनी याची तत्काळ दखल घेत चाव्या पूर्ववत बसविण्यात आल्या. रेल्वे रुळाच्या मजबुतीसाठी चाव्या महत्त्वाच्या ठरतात; परंतु रेल्वे येताच रुळाला असणाऱ्या चाव्या आपणहून उचकटून बाहेर पडण्याचा प्रकार होतो. अशा जुनाट चाव्या बदलण्यात येत नसल्याने त्या वारंवार बाहेर येण्याचा प्रकार होतो. आता या चाव्या व्यवस्थित बसविण्यात आल्या. 

Web Title: Railway spot f keys missing