बैल पोळा सणावर पावसाचे सावट

भाऊसाहेब चाेपडे
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

गेल्या दोन आठवड्यांपासून आळंद (ता.फुलंब्री) परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याने पिके करपायला सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पोळा सणाच्या दोन दिवस असलेल्या खांदेमळणी असते. बैलांना नदी तलावात धुतले जाते.

आळंद (जि.औरंगाबाद) - गेल्या दोन आठवड्यांपासून आळंद (ता.फुलंब्री) परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याने पिके करपायला सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पोळा सणाच्या दोन दिवस असलेल्या खांदेमळणी असते. बैलांना नदी तलावात धुतले जाते.

मात्र परिसरात जमिनीला पाणी नसल्याने भेगा पडल्या आहेत. नदी-नाले कोरडेठाक पडल्याने त्याचाच फटका शेतकऱ्यांच्या सर्जा राजाच्या बैलपोळा सणाला बसल्याचे दिसून येत आहे. पोळा सण जवळ आल्याने व्यापाऱ्यांनी आळंद येथील (ता.23) शुक्रवारी भरलेल्या आठवडे बाजारात बैलांना सजविण्यासाठी लागणारे विविध साज आणले होते. मात्र शेतकऱ्यांनी खरेदी केली नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

परिसरात शेतकरी बैल पोळा व पाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. बैलांना सजविण्यासाठी बाजारातून विविध नक्षीकाम असलेल्या झालर, गोंडे, घागरमाळ, मोरणी, कासरे, शिंगांना लावण्यासाठी विविध रंगाचे हेंगुळ, पट्ट्या, नाथनसह विविध सजावटीचे साहित्य आठवडे बाजारातील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसले. मात्र बाजारात शुकशुकाट दिसून आला. येत्या शुक्रवारी (ता.30) रोजी पोळा सण असल्याने परिसरातील आळंद नायगव्हान, जातवा, उमरवती, पिंप्री आदी गावांतील शेतकऱ्यांना हा खरेदीसाठी शेवटचा बाजार असल्याने शेतकरी खरेदीसाठी आले. मात्र प्रत्येक वेळी होणारी खरेदी न करता कमीत कमी साहित्य घेऊन शेतकरी परतल्याचे चित्र दिसले. दोन ते तीन आठवड्यापासून परिसरात पाणी नसल्याने पिके हातातून जातात की काय या चिंतेमुळे शेतकरी व बैलांचा सण या आठवड्यात पाणी पडल्यास आनंदी होईल.

 

पोळा सणाला आम्ही प्रत्येक वर्षी बैलांना सजावटीसाठी नवी-नवीन साहित्य आणतो. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांमध्ये पोळा सणाचा उत्साह दिसत नाही. शेवटचा बाजार असला तरी शेतकऱ्यांनी खरेदी करताना आखडता हात घेतला.
- रवी केवट, विक्रेता, वडोद बाजार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Affects Bail Pol festival