पावसाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी 

प्रकाश ढमाले
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

पिंपळगाव रेणुकाई परिसरातील चित्र, शेतीचे नुकसान, जनजीवनही विस्कळित 

पिंपळगाव रेणुकाई (जि.जालना) - सततच्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले असून यात शेती, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या डोळ्यांत येणारे पाणी अतिपावसाने कायम राहिले आहे. "पड पाण्या होऊ दे पाणी पाणी' म्हणण्याची वेळ आली होती. आता "पड उन्हा वाळू दे आमच्या धना (पिके)' अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. परिसरातील शेतकरी शुक्रवारी (ता. 25) शेतात पिके वाचविण्यासाठी कष्ट घेताना दिसले. 

परिसरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. मुसळधार बरसून शेतीसकट माल डोळ्यासमोर वाहताना शेतकऱ्यांचे डोळे पाणावत आहेत. रात्री धो-धो पडल्यानंतर शेतकरी सकाळीच शेती गाठून आपल्या पिकांची राखरांगोळी पाहताना दिसत आहे. थोडी जरी उघडीप दिली की शेतकरी पिके पदरात कशी पडतील याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. झालेल्या पावसाने उभ्या कपाशीच्या बोंडांना कोंब फुटलेले दिसत आहेत. तर जमा करून ठेवलेल्या मका, सोयाबीनच्या गंजीतून कोंब बाहेर येताना दिसत आहेत. अनेकांची सोयाबीन, मका पाण्यावर तरंगत आहे. पाऊस उघडीप देतच नसल्याने काही शेतकऱ्यांनी मका सोलून वाळवणीला टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोललेल्या मकातही मकाला कोंब दिसत असून मका काळा पडत आहे. जवळपास पन्नास टक्के पिके वाया गेली आहे.

जमिनीवर पडलेल्या कपाशीची बोंडंही सडून गेली आहेत. मका, सोयाबीन सोंगणी, कापूस वेचणीसाठी पाहावे लागणारे मजूर पिके पाण्यातून काढण्यासाठी पाहावी लागत आहेत. यासाठीही मजूर कमी पडत आहेत. पुराचे पाणी शेतामध्ये शिरत आहे. सर्वत्र पाणी खळखळ वाहताना दिसत आहे. नदी, नाल्यांमध्ये वाहणारे पाणी शेतांतून वाहताना दिसत आहे. दरम्यान, पाऊस उघडीप देत नसल्याने रब्बी पेरणीसाठी शेती तयार करणेही अवघड झाले आहे. पाऊस उघडल्यानंतरही शेती तयार करण्यासाठी किमान वीस दिवस तरी लागणार असल्याने रब्बीची लागवड उशिरा होण्याची शक्‍यता आहे. आता पावसाने त्रस्त केले आहे, तर पुढे गारपिटीची धास्ती शेतकऱ्यांमध्ये लागून आहे. 

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी 
पिंपळगाव रेणुकाई परिसरात पावसाळ्याच्या प्रारंभीपासून पाऊस सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून रब्बी लागवडीसाठी सहकार्य करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain badly affected to crops