पाऊस झालाय क्रूर, पिकांवर अंकुर 

पारध : ज्वारीच्या कणसांमध्ये फुटलेले अंकुर.
पारध : ज्वारीच्या कणसांमध्ये फुटलेले अंकुर.

पारध (जि.जालना) - दुष्काळाच्या झळा बसल्यानंतर पावसाची सर्वांनी आतुरतेने वाट पाहिली. पावसाळ्याच्या प्रारंभी सारे व्यवस्थित सुरू होते. पाऊस पडत होता, पिके उगवत होती; पण दिलासादायक पाऊस नंतर उघडिपीचे नाव घेईना, पाऊस त्रासदायक वाटू लागला. त्यातच हाताशी पीक आलेले पावसाने गिळून घेतले. पाऊस क्रूर झाला आणि मक्‍याचे कणीस, ज्वारीचे कणीस, सोयाबीनच्या पिकाला अंकुर फुटू लागले. 

भोकरदन तालुक्‍यातील पारध परिसरात तर पावसाचा इतका मारा झाला, की ऐन हातातोंडाशी आलेला खरीप हंगामातील पिकांचा घास हिरावला गेला. आता ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या हातात पैसा राहिला नाही. दिवाळी सणावर ओल्या दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

पारध परिसरात परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांची मोठे नुकसान झाले आहे. तर मका, सोयाबीन, कापूस पिकांना जागेवरच कोंब येत असल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पारधसह परिसरात गेल्या आठवड्यापासून पाऊस सुरूच असल्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. तर सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे याचा परिणाम जनजीवनावर झाला असल्याचे चित्र आहे. शासनाकडून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

यंदाच्या पावसाने खरीप पिकांची मोठी वाट लावली असून, दरवर्षी दिवाळी सणाला शेतकऱ्यांच्या हातात खरीप हंगामातील पिकांची काढणी, मळणी होऊन पैसा येतो; परंतु यावर्षी ऐन दिवाळीतच परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कठीण झाली आहे. तर दिवाळीत शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. 
बंकिमचंद्र लोखंडे, शेतकरी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com