पुराच्या पाण्याने जमिनी निघाल्या खरवडून 

प्रकाश ढमाले
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

पिंपळगाव रेणुकाई (ता.भोकरदन ) : शेतकऱ्यांच्या माथी पुन्हा वाढला खर्च

पिंपळगाव रेणुकाई (जि.जालना) - परतीच्या मुसळधार पावसाने पिकांबरोबर अनेक शेतकऱ्यांची पुराच्या पाण्याने जमिनी वाहून गेल्या, खरवडून निघाल्या. शेतांना नाल्याचे स्वरूप आले आहे. ही शेती पुन्हा तयार करण्यासाठी मोठा खर्च येणार असून शासनाने यासाठी भरीव मदत करावी अशी आर्त हाक शेतकरी करत आहे. 

परतीच्या पावसाने पिके गेल्यामुळे शेतकरी हतबल झाले तर आहेच; पण माती बांध, सिमेंट बांध फुटल्याने, नदी, नाले दुतर्फा ओसंडून वाहिल्याने पुराचे पाणी शेतात शिरून शेतकऱ्यांची सुपीक शेती वाहून शेताला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले. पारंपरिकपणे करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीचे वाटोळे झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी गेल्या उन्हाळ्यात मोठा खर्च करून तलावातील गाळ शेतीत टाकून शेतीची सुपीकता वाढवण्याचा प्रयत्न केला होता. त्यास चांगल्या प्रकारे यश येऊन त्यात पिके चांगली आली होती; मात्र परतीच्या पावसाने या सर्व पिकांबरोबर शेतीलाही आपल्या प्रवाहात वाहून नेले. आता हीच जमीन पूर्वपदावर आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागणार आहे.

गेल्या दहा वर्षांपासून शेतकऱ्यांचे शेतीचे गणित बसले नसताना हेच गणित पुन्हा त्यांना पुढे घेऊन गेले. हा खर्च त्यांना झेपणे अवघड झाले आहे. यंदा मोठी आशा होती; मात्र आशेवर पाणी फेरले आहे. शासनाने या जमिनी पूर्वपदावर आणण्यासाठी शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी होत आहे. 

माझी शेतजमीन धामणा नदीच्या काठावर आहे. ही जमीन आम्ही कित्येक वर्षांपासून कसत आहोत. जमिनी शेजारीच सिंमेंट बांध उभारण्यात आला आहे. मात्र या सिमेंट बांधाचा उतार सरळ काढण्याऐवजी शेताकडे काढला गेला, परिणामी पुराच्या पाण्यामुळे जमीन वाहून मोठे नुकसान झाले आहे. 
-त्र्यंबक सोनुने, शेतकरी. शेलूद 
............... 
पाऊस चांगला असल्याने यंदा पिके चांगली आली; मात्र सततच्या रिपरिपीने पिके वाया गेली. सोयाबीन भिजल्याने मोठे नुकसान झाले. यामुळे मोठी अडचण उभी राहिली. त्यातच परतीच्या पावसाने पूर येऊन जमीन वाहिल्याने मोठे संकट उभे राहिले आहे. 
- सुखदेव सोनुने, शेतकरी, शेलूद 
............. 
आधीच दीड एकर जमिनीमुळे उत्पन्न अल्प आहे. मजुरी करून संसार चालवावा लागतो. मुलांचे शिक्षण, आरोग्य यातच मजुरी जाते. सततच्या दुष्काळामुळे कर्जाचा डोंगर पाठ सोडत नाही. दीड एकरातच मका पेरली होती. मोडून शेतात पांगलेली होती मात्र परतीच्या पावसाने संपूर्ण मका तर वाहिलीच सोबत शेतही वाहून गेल्याने. खर्चाचा डोंगर आणखी वाढला आहे. 
- शालिक आहेर, शेतकरी, पिंपळगाव रेणुकाई 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain badly affected to farms