esakal | पावसाने केली सोयाबीनची दैना ! एकरी उत्पन्नात निम्म्यांनी घट
sakal

बोलून बातमी शोधा

Rain Damaged Soybean

यंदाचा खरीप हंगाम निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकल्याने उडीद, मूग आणि सोयाबीनची नासाडी झाली.

पावसाने केली सोयाबीनची दैना ! एकरी उत्पन्नात निम्म्यांनी घट

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : यंदाचा खरीप हंगाम निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकल्याने उडीद, मूग आणि सोयाबीनची नासाडी झाली. राज्य सरकारने हमीभाव जाहीर करून ऑनलाईन नोंदणीचे आवाहन केले असले तरी सद्यःस्थितीत कृषी बाजार समितीत अडत व्यापारी खरेदीत चांगल्या दर्जाच्या मालाला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत आहे. मात्र आवक फार मोठ्या प्रमाणात नसल्याने मोजक्याच शेतकऱ्यांना वाढीव भावाचा फायदा होत आहे.

भूकंपग्रस्तांच्या दुसऱ्या पिढीचीही जखम 'भळभळलेलीच', आरक्षणाचा लाभ...

दरम्यान पावसाने नुकसान झालेल्या सोयाबीनची काढणी प्रक्रिया सुरू आहे. काही मोजक्या ठिकाणी झालेल्या राशीमुळे अडत बाजारात सोयाबीन आले आहे. मात्र भाव कमी मिळत आहे. शिवाय एकरी उत्पन्नात निम्म्यांनी घट झाली आहे. तालुक्यातील एकुण शेतजमिनीच्या तुलनेत खरिप हंगामाचे क्षेत्र अधिक असते. यंदा पावसाच्या अनियमिततेचा फटका खरीप पिकाला बसला आहे. ऐन काढणीच्या अवस्थेत असलेल्या मूग, उडीद व सोयाबीनला पावसाचा दगाफटका बसल्याने मालाची प्रत खालावली. काही ठिकाणी उडीद, मूगाचा चांगल्या प्रतिचा माल शेतकऱ्यांना मिळू शकला. मात्र सोयाबीनचे क्षेत्र अतिपावसाने नुकसानीच्या दाढेत गेले आहे.उडीदाची आवक कमी, भाव अधिक !
मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या उडीद, मूगाला पावसाचा आणि रोगराईचा फटका बसल्याने मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. उडीदासाठी प्रतिक्विंटल सहा हजाराचा हमी भाव आहे. अडत बाजारात आवक सुरू झाली असली तरी ती फार मोठ्या प्रमाणात नाही, परंतू उडीदाला प्रतिक्विंटल सहा हजारापासुन सात ते आठ हजारापर्यंत भाव मिळतो आहे. मूगाचा हमीभाव सात हजार १९६ आहे. सध्या अडत बाजारात चांगल्या प्रतिच्या मालाला सात हजार दोनशे रूपयांपर्यंत भाव मिळतोय. हा भाव अधिक काळापर्यंत टिकला तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळणार आहे.

लातूर : किल्लारी भूकंपातील मृतांना श्रद्धांजली अर्पण, दुर्घटनेला पूर्ण झाली २७...

सोयाबीनचे उत्पन्न निम्याने घटले !
रानात उभे असलेले व काढणीसाठी तयार झालेले सोयाबीन अधिक पाऊस झाल्याने खराब झाले आहे. अनेक शिवारात सोयाबीनच्या क्षेत्रात पाणी साचले आहे. चिखल झाल्याने काढणीसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. एकरी तीन ते चार हजार रुपये काढणीसाठी मोजावे लागत आहेत. ओलसर व निकृष्ठ प्रत असल्याने भाव कमी मिळतो आहे. एकरी साधारणतः वीस ते २५ कट्टे उतारा अपेक्षित होता. मात्र तो दहा ते बारा कट्टेवर आला आहे.

अडत बाजारात प्रतिक्विंटल साधारणतः साडेतीन हजारापर्यंत भाव मिळत आहे. हमीभावाचा दर तीन हजार ८८० रुपये आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी केंद्र सुरु करण्याची गरज आहे. शिवाय भारतीय अन्न महामंडळ व नाफेडने खूल्या बाजारात सोयाबीनची खरेदी सुरू केल्यास शेतकऱ्यांच्या पदरी चार पैसे आगाऊ मिळू शकतात.


यंदा शेवटच्या टप्प्यात पावसामुळे सोयाबीनला मोठा फटका बसला. पेरणी ते काढणीपर्यंतचा खर्च मोठा आहे. मात्र उत्पन्नात निम्म्यांनी घट झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. विमा कवच चांगला मिळावा आणि नुकसान भरपाईही मिळावी अशी अपेक्षा आहे.
-अप्पास जमादार, शेतकरी, बेटजवळगा

संपादन - गणेश पिटेकर