तगलेल्या पिकांना दमदार पावसाची आस 

कृष्णा भावसार
रविवार, 18 ऑगस्ट 2019

मंठा - तालुक्‍यात आतापर्यंत पडलेल्या रिमझिम पावसाने विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. परंतु, रिमझिम पावसावर सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर आदी खरिपाची पिके सध्या तरी तग धरून आहेत. आता फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या पिकास दमदार पावसाची आवश्‍यकता असल्याचे शेतकरी बोलत आहेत. 

मंठा - तालुक्‍यात आतापर्यंत पडलेल्या रिमझिम पावसाने विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. परंतु, रिमझिम पावसावर सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर आदी खरिपाची पिके सध्या तरी तग धरून आहेत. आता फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या पिकास दमदार पावसाची आवश्‍यकता असल्याचे शेतकरी बोलत आहेत. 

मंठा तालुक्‍यात आतापर्यंत शनिवारपर्यंत (ता. 17) 275 मिलिमीटर पाऊस पडला असून तो वार्षिक सरासरीच्या 38.57 टक्के इतका आहे. सर्वच मंडळांत सारखा पाऊस नाही, काही मंडळात जास्त तर काही मंडळात कमी प्रमाणात पडला आहे. रिमझिम पडलेल्या पावसावर आतापर्यंत खरिपाची सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद ही पिके तग धरून आहेत. परंतु, रिमझिम पावसाने पिकावर रोग, किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नामांकित कंपनीच्या कीटकनाशकाची फवारणी करावी लागत आहे. तसेच, सोयाबीनची वाढ भरपूर झाल्याने सोयाबीन पीक फवारणी करताना पिकात असलेल्या सापांपासून बचाव करण्याकरिता एक जास्तीचा मजूर हातात काठी घेऊन ठेवावा लागत आहे. त्यामुळे पीक फवारणीचा खर्च वाढत आहे. 

रिमझिम पावसाने देखील दहा दिवसापासून उघडीप दिली असून सध्या वातावरणात गरमी जाणवत आहे. खरिपाची पिके काही ठिकाणी फुलोऱ्यात, तर काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत असून रिमझिम पावसावर आलेल्या पिकापासून शेतकऱ्यांना थोडाबहुत आर्थिक हातभार लागणार आहे. परंतु, पाण्याअभावी व वातावरणातील गर्मीने पिके सुकून जात असून तालुक्‍यात सध्या दमदार पावसाची आवश्‍यकता आहे. 

सध्या खरिपाची पिके फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत असून पिकास दमदार पावसाची आवश्‍यकता आहे. दमदार पावसामुळे पिकावरील रोग किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल, पीक योग्य वाढीस लागेल व पिकाचे उत्पन्न चांगले मिळेल. 
- कैलास भोसले, 
शेतकरी, लिंबोना. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain expected for crops