पावसाची प्रतीक्षा कायम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

जालना - जून महिना लोटल्यानंतरही जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १०५.२४ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे आकाशात येणारे ढग कोसळणार कधी, असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे.
यंदा हवामान खात्याने समाधानकारक पाऊस असल्याचे भाकित केले होते; मात्र यंदाही पावसाने जिल्ह्यात हुलकावणी दिली आहे.

जालना - जून महिना लोटल्यानंतरही जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १०५.२४ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे आकाशात येणारे ढग कोसळणार कधी, असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे.
यंदा हवामान खात्याने समाधानकारक पाऊस असल्याचे भाकित केले होते; मात्र यंदाही पावसाने जिल्ह्यात हुलकावणी दिली आहे.

जिल्ह्यात एक जूनपासून दोन जुलैपर्यंत १०५.२४  मि.मी. पाऊस झाला आहे. यात जालना तालुक्‍यात १०७.४० मिमी, बदनापूर तालुक्‍यात १३०.८० मिमी, भोकरदन तालुक्‍यात ९२.२८ मिमी, जाफराबाद तालुक्‍यात ५३.२० मिमी, परतूर तालुक्‍यात १४६ मिमी, अंबड तालुक्‍यात ८३.५८ मिमी, घनसावंगी तालुक्‍यात ९७.४३ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागल्या असून आकाशातील ढग कोसळणार कधी, असा प्रश्‍न सर्वांपुढे येऊन ठेपला आहे.

२८.४१ टक्केच पेरण्या
जिल्ह्यातील शेतीचे क्षेत्र ः ५ लाख ७९ हजार ३०४ हेक्‍टर 
पेरणी झालेले एकूण क्षेत्र ः एक लाख ६५ हजार ४६ हेक्‍टर
आतापर्यंत केवळ २८.४१ टक्केच पेरण्या उरकल्या
कापसावरही परिणाम होण्याची शक्‍यता 
सोयाबीनच्या पेऱ्यासाठी १५ जुलैपर्यंत हंगाम

शेतकरी आर्थिक संकटात 
सुमारे चार वर्षांपासून दुष्काळाचा फटका सोसणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या हंगामातही पावसाच्या लहरीपणाने नाकीनऊ आणले होते. अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यंदाच्या हंगामाकडून अपेक्षा उंचावल्या असताना ऐन पेरणीच्या काळातच पाऊस नसल्याने यंदाही महागडे बियाणे मातीत जाते की काय, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, आर्थिक तडजोड करून बहुतांश शेतकऱ्यांनी जूनमध्ये दोन टप्प्यांत पेरणी आटोपून घेतली. त्यामुळे पाऊस आणखीच लांबला, तर काही भागांत दुबार पेरणीचे संकट उद्भवणार असून शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.

उडीद, मुगाच्या पेरणीचा कालावधी संपला आहे; तसेच कपाशी लागवड उशिरा झाल्याने पाच ते दहा टक्के उत्पादन कमी होण्याची शक्‍यता आहे. तसेच उशिरा लागवड झालेल्या कपाशीवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. सोयाबीनची पेरणी ता. १५ जुलैपर्यंत होऊ शकते.
- झणझण पाटील, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना.

परिसरात गेल्या महिनाभरापासून जोरदार पाऊस नसल्याने शेतात उगवलेली पिके सुकून जात आहेत. आर्थिक तडजोड करून शेतकऱ्यांनी पेरणी केली; मात्र पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडण्याची शक्‍यता आहे. गेल्या सुमारे तीन वर्षांपासून शेतकरी दुष्काळाशी दोन हात करून जगत आहेत, यंदाही पावसाने पाठ फिरवली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
- भगवानराव गोल्डे, शेतकरी, अंबड

Web Title: rain farmer agriculture