अवकाळीचे तडाख्यांवर तडाखे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

औरंगाबाद - सलग दहा दिवसांपासून मराठवाड्याला ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झोडपून काढत आहे. दिवसभर आकाशात गर्दी करणारे काळे ढग सायंकाळी वादळी वाऱ्यासह बरसतात. मंगळवारीही (ता. 17) बीड, लातूर, उस्मानाबादसह जालना व औरंगाबाद जिल्ह्यात काही भागाला वादळी पावसाचा तडाखा बसला.

औरंगाबाद - सलग दहा दिवसांपासून मराठवाड्याला ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झोडपून काढत आहे. दिवसभर आकाशात गर्दी करणारे काळे ढग सायंकाळी वादळी वाऱ्यासह बरसतात. मंगळवारीही (ता. 17) बीड, लातूर, उस्मानाबादसह जालना व औरंगाबाद जिल्ह्यात काही भागाला वादळी पावसाचा तडाखा बसला.

बीडमधील कडा परिसरात (ता. आष्टी) दुपारी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. कडा गावाजवळच्या देवी निमगाव (ता. आष्टी) येथे वीज पडून महिलेचा मृत्यू झाला. तर, केरुळ येथे काही घरांवरील पत्रे उडून गेले. या घटनेत पाच जण जखमी आहेत. पाटोदा शहरात सुमारे अर्धा तास झालेल्या पावसामुळे मिरची, आंबा, टरबूज अशा पिकांना फटका बसला आहे.

उस्मानाबाद आणि लातूर शहरातही सायंकाळी जोरदार वादळी पाऊस झाला. लातूरमध्ये काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने घरांचे नुकसान होऊन वाहतूक ठप्प झाली. उदगीर आणि औसा येथेही सायंकाळी पाऊस झाला. उस्मानाबाद शहराला सायंकाळी पाऊण तास पावसाने झोडपले. जिल्ह्यात 11 दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे.

जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यावर दिवसभर असलेले ढग रात्री काही भागांत बरसले. रोहिलागड, किनगाव (ता. अंबड) परिसरात विजांच्या कडकडाटासह सायंकाळी पाऊस झाला. तर, औरंगाबादमध्येही काही ठिकाणी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. चित्तेपिंपळगाव, निपाणी, झाल्टा (ता. औरंगाबाद), पाचोड, आडगाव (ता. पैठण) व वैजापूर शहरासह तालुक्‍यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली.

बीडमध्ये महिलेचा वीज पडून मृत्यू
देवी निमगाव (ता. आष्टी) येथे मंगळवारी (ता. 17) वीज पडून मंदा राजेंद्र राऊत या महिलेचा मृत्यू झाला. त्या शेतात गवत कापण्यासाठी गेल्या होत्या.

Web Title: rain hailstorm loss