जालन्यात विजांसह पावसाची हजेरी

उमेश वाघमारे
Sunday, 18 October 2020

जालना शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी रविवारी (ता.१८) रात्री साडेसात वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने अचानक हजेरी लावली.

जालना : जालना शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी रविवारी (ता.१८) रात्री साडेसात वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने अचानक हजेरी लावली. त्यामुळे वातावरण थंड झाले होते. मागील आठ दिवसांपासून शहरात पावसाने उघडीप दिली होती. मात्र, शनिवारी (ता.१७) मध्यरात्री शहरात पावसाच्या हलक्या सारी कोसळल्या. त्यानंतर रविवारी (ता.१८) दिवसभर कडक उन्हामुळे उकाड्यात मोठी वाढ झाली होती.

सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी झाल्याने उकाड्यात अधिक भर पडली. दरम्यान रात्री साडेसात वाजेच्या सुमारास शहरात अचानक मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. काही काळ पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे वातावरण थंड झाले होते. सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे पावसाची रिपरिप सुरू होती.
दरम्यान जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे उरल्यासुरल्या पिकांचे ही नुकसान झाले आहे, तर बदनापूर येथे पावसाने हजेरी लावली.

औरंगाबाद जिल्ह्यात वीज पडून दोघे ठार, विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

टेंभुर्णी परिसरात विजांसह जोरदार पाऊस
टेंभुर्णी परिसरामध्ये रविवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अगोदरच हतबल झालेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. वेचणीस आलेल्या कापसाच्या वाती होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दरम्यान रविवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास टेंभुर्णीसह परिसरातील अकोला देव, बुटखेडा, पोखरी, नांदखेडा, पापळ, वरखेडा, कुंभारझरी या शिवारामध्ये तासभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे वेचणीस आलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान रब्बीची पेरणी ही लांबणीवर पडत आहे. विशेष म्हणजे या पावसामध्ये विजांचा कडकडाट असल्याने अनेकांनी घराबाहेर पडणे मुश्कील झाले. दरम्यान पाऊस सुरू होताच परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.

वीज गुल
पावसाच्या सरी कोसळण्यास सुरवात झाली की शहरातील वीज गुल होते. रविवारी (ता.१८) ही रात्री पावसाला सुरवात झाल्यानंतर शहरातील वीज गुल झाली होती. त्यामुळे शहरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. तब्बल एक तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain In Jalna City