रिमझिम सरींनी न्हाले शेतशिवार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

जालना जिल्ह्यात ठिकठिकाणचे चित्र, सर्वदूर हजेरीमुळे समाधान

जालना -  मागील दिन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. शुक्रवारी (ता.20) सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 24.78 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. 

यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला जिल्ह्यात अल्प पाऊस झाला होता. त्यामुळे खरीप पिकेही धोक्‍यात आली होती; मात्र त्यानंतर अधूनमधून झालेल्या पावसाने खरीप पिके तरली; मात्र जिल्ह्यातील नद्या, नाले, तलाव, लघू व मध्यम प्रकल्प कोरडेच राहिले; मात्र मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात काही मंडळांत अतिवृष्टी झाल्याने नद्या, नाले खळखळून वाहिले आहेत. तर भोकरदन तालुक्‍यात धामना व पद्मावती प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी सलग तीन दिवस जिल्ह्यात पावसाची अधूनमधून सर्वदूर हजेरी लावली. शुक्रवारी  सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात 23.78 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 
यात जालना तालुक्‍यातील विरेगाव मंडळात 55 मिलिमीटर, रामनगर मंडळात 41, भोकरदन तालुक्‍यातील धावडा मंडळात 52, जाफराबाद तालुक्‍यातील कुंभारझरी मंडळात 48, जाफराबाद मंडळात 46 मिलिमीटर, मंठा तालुक्‍यातील तळणी मंडळात 51, ढोकसाळ मंडळात 47 मिलिमीटर, अंबड तालुक्‍यातील रोहिलागड मंडळात 42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, जिल्ह्यातील 26 मंडळांत गुरुवारी (ता. 19) पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात 24.79 मिलिमीटर पाऊस झाला. यात जालना तालुक्‍यात 24.88, तर आतापर्यंत 380.44 मिलिमीटर, बदनापूर तालुक्‍यात 19.20, तर आतापर्यंत 404.40 मिलिमीटर, भोकरदन तालुक्‍यात 30.63, तर आतापर्यंत 638.54 मिलिमीटर, जाफराबाद तालुक्‍यात 36.80, तर 501.60 मिलिमीटर, परतूर तालुक्‍यात 21.20, तर आतापर्यंत 425.85 मिलिमीटर, मंठा तालुक्‍यात 32, तर आतापर्यंत 384 मिलिमीटर, अंबड तालुक्‍यात 19.86, तर आतापर्यंत 491.02 मिलिमीटर, घनसावंगी तालुक्‍यात 13.71, तर आतापर्यंत 451.19 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ता. एक जूनपासून शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात सरासरी 459.63 मिलिमीटर पाऊस झाला आहे. 

जालन्यात पावसाची हजेरी 
सलग चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता.20) शहरामध्ये रात्री सातच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावली. दरम्यान, शुक्रवारी (ता.20) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे जोरदार पाऊस बरसेल अशी आशा होती. मात्र, रात्री सातच्या सुमारास पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या.

शहागड परिसरात जोरदार पाऊस 
शहागड ः परिसरात मागील तीन-चार दिवसांपासून पाऊस हजेरी लावत असून, शुक्रवारी (ता.20) सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्‍त होत आहे. शहागडसह बळेगाव, आपेगाव, साष्टपिंपळगाव, डोमलगाव, गोरी, गांधारी, वाळकेश्वर, कुरण, पाथरवाला बुद्रुक येथे गुरुवारी व शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतशिवारांत सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पिकांमध्ये पाणी साचले असून, ओढे-नाले वाहू लागले आहेत. परिसरातील चांदसुरा, मांगणी या नद्यांसह ओढे, नाले खळखळ वाहू लागले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Jalna district