उन्हाळ्याच्या प्रारंभीच पावसासह गारपीट 

आनंद इंदानी
बुधवार, 18 मार्च 2020

बदनापूर तालुक्यातील जवळपास दहापेक्षा अधिक गावांत मंगळवारी (ता. १७) सायंकाळी अवकाळी पावसासह गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीत रब्बी पिकांसह फळपिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग पुरता हवालदिल झाला आहे.  

बदनापूर (जि.जालना) - एकीकडे कोरोना या विषाणुजन्य आजाराचे संकट थोपविण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्यांच्या भाळी पुन्हा अस्मानी संकट उभे राहिले आहे. बदनापूर तालुक्यातील जवळपास दहापेक्षा अधिक गावांत मंगळवारी (ता. १७) सायंकाळी अवकाळी पावसासह गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीत रब्बी पिकांसह फळपिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग पुरता हवालदिल झाला आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे. 

अवघ्या महाराष्ट्रात कोरोना या आजाराविषयी चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे हा आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी ग्रामीण भागात सरसावलेला असताना पुन्हा अस्मानी संकटाने बदनापूर तालुक्यावर कहर माजवला आहे.

हेही वाचा : नवीन वर्षात तरी बदनापूर बसस्थानक होईल का

तालुक्यातील अकोला, निकळक, कंडारी बुद्रुक, कंडारी खुर्द, उज्जैनपुरी, भराडखेडा, आन्वी, धामणगाव, नांदखेडा अशा पट्ट्यात अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली. कुठे हरभऱ्याच्या आकाराच्या तर कुठे बोरांपेक्षाही मोठ्या आकाराच्या गारा पडल्याने त्यात गहू - ज्वारीसह इतर रब्बीपिके आडवी झालीत. आंब्याच्या झाडांचे मोहोर द्राक्षांचे घड गळून पडले. कांदे, टोमॅटोंचेही मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह आलेला अवकाळी पाऊस तालुक्यातील बहुतांशी भागात बरसला. त्यामुळे आधीच कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या लोकांना आता बदलत्या मोसमाच्या आजारांनाही सामोरे जाण्याची पाळी आहे.

सतत बदलते वातावरण

बदनापूर तालुक्यात मागील दोन दिवसांपासून पहाटे थंडी, दुपारी कडक ऊन तर सायंकाळी ढगाळ असे सतत बदलते वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. १७) सायंकाळी ढगाळ वातावरण असताना मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरवात झाली. तर काही ठिकाणी गारपिटीने हातातोंडाचा घास हिरावला. मागील वर्षी आक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने थैमान माजविले होते. त्यात खरीप पिके उद्ध्वस्त झाली होती. आता पुन्हा गारपिटीच्या फटक्याने रब्बी व फळपिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

बदनापूर तालुक्यातील अकोला, निकळक, उज्जैनपुरी, भराडखेडा अशा भागांत मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने अशा नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून आपत्तिग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी. 
-गजानन गीते, 
जिल्हाध्यक्ष, मनसे 

बदनापूर तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. तर काही गावांत गारपिटीही झाल्याची माहिती हाती आली आहे. अशा नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करण्याची सूचना महसूल व कृषी यंत्रणेला केली आहे. 
- छाया पवार, 
तहसीलदार, बदनापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Jalna district