जुईत पाऊस थुईथुई... 

दीपक सोळंके 
Friday, 12 June 2020

जुई धरण क्षेत्रात गुरुवारी (ता.११) रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसामुळे  नदीला मोठा पूर आला होता. या पावसामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ होऊ लागल्याने आतापर्यंत ४० टक्के जलसाठी झाला आहे त्यामुळे भोकरदनकरांना दिलासा मिळाला आहे.

भोकरदन (जि.जालना) - शहरासह तालुक्यातील पंचवीस गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या दानापूर येथील जुई धरण क्षेत्रात गुरुवारी (ता.११) रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसामुळे  नदीला मोठा पूर आला होता. या पावसामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ होऊ लागल्याने आतापर्यंत ४० टक्के जलसाठी झाला आहे त्यामुळे भोकरदनकरांना दिलासा मिळाला आहे. 

गतवर्षी परतीच्या अवकाळी पावसाने ओव्हरफ्लो झालेल्या जालना जिल्ह्यातील जुई धरणात ता. १० जूनपर्यंत केवळ ११ टक्के म्हणजे ५ फूट इतकाच जलसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे भविष्यात शहरासह पंचवीस गावांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतू, गुरुवारी रात्री उशिरा सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव, पानवदोड शिवना, उंडणगाव, अंभई आदी भागात जवळपास अडीच ते तीन तास मुसळधार पाऊस झाला याशिवाय भोकरदन तालुक्यातील आन्वा, कोदा, धोंडखेडा, आन्वापाडा, वाकडी, कुकडी आदी भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने या भागातून वाहणाऱ्या जुई नदी व लहान मोठ्या वढे, नाल्यांना मोठा पूर गेला.

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

त्यामुळे जुई धरणातील जलसाठ्यात शुक्रवारी दुपारपर्यंत ५ फुटांनी वाढ झाली होती. दुपारी १२ वाजेपर्यंत ४० टक्के म्हणजे १० फूट जलसाठा धरणात जमा झाल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

पहिल्याच पावसात धरणात समाधानकारक वाढ झाल्याने भोकरदन शहरासह दानापूर, दहेड, सुरंगळी, सुरंगळी वाडी, मूर्तड, वाडी, कठोरा बाजार, वाकडी, कुकडी, करजगाव, कल्याणी, सिपोरा बाजार, रेलगाव, बाभूळगाव, विरेगाव, भायडी, तळणी, पिंपळगाव रेणूकाई, रामेश्वर कारखाना परिसर, दगडवाडी आदी गावांना दिलासा मिळाला आहे. 

नदी लगतच्या शेतीचे नुकसान 

आन्वा परिसरातून वाहणाऱ्या जुई नदी काठच्या काही शेतात पुराचे पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यात अनेक शेतकऱ्यांचे ठिबक संच, पाईप, व पेरण्या केलेले बियाणे वाहून गेल्याचे सांगण्यात आले असून, नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच नदी काठी असलेल्या जि.प. प्राथमिक शाळा व देशमुख हायस्कूल व आरोग्य उपकेंद्राची संरक्षण भिंती देखील या पुरामुळे वाहुन गेल्या आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Jalna district