पावसाळ्याचा महिना; २६१ टॅंकर, ११ छावण्या सुरूच

Beed-District
Beed-District

बीड - मागच्या वर्षीच्या दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात पावसाची मोठी आस लागलेली आहे; मात्र पावसाळ्याचा एक महिना उलटला तरी आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ १२.६७ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

जिल्ह्याच्या पावसाची वार्षिक सरासरी ६६६.३६ मिमी असून, आतापर्यंत केवळ ८४.४ मिमी एवढा पाऊस झाला आहे. पाटोदा (११२.५ मिमी) आणि माजलगाव (१०९.३ मिमी) या दोनच तालुक्‍यांत शंभर मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. ६३ पैकी सहा महसूल मंडळांत अद्यापही पन्नास मिमीपेक्षा कमी पाऊस असून जलस्रोतांतील पाणीसाठा ‘जैसे थे’च आहे.

खरिपाच्या पेरण्या आणि कपाशीची लागवड जोरात असून सुरवातीला लागवड केलेल्या कपाशीची आंतरमशागतीची कामेही सुरू आहेत; मात्र जमीन कोरडी पडत असल्याने पिके सुकू लागली आहेत. 

मागच्या वर्षी वार्षिक सरासरीच्या निम्माच पाऊस झाला. खरिपाच्या पेरण्यांनंतर पावसाने उघडीप दिल्याने पिके वाळून गेली. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली. परतीच्या पावसानेही दडी मारल्याने रब्बीची पेरणी केवळ १५ टक्के क्षेत्रांवर झाली. मागच्या वर्षी मोठे पाऊसच न झाल्याने जलस्रोतांतील पाणीपातळी कमालीची घटली होती. 

दरम्यान, यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आतापर्यंत दोन टप्प्यांत जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे; मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. आतापर्यंत केवळ १२.६७ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. 

छावण्यांची संख्या ११ वर
चारा-पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या चारा-पाण्याची सोय व्हावी, यासाठी शासनाने चारा छावण्या सुरू केल्या. राज्यात सर्वाधिक ९३३ चारा छावण्यांना जिल्ह्यात मंजुरी देण्यात आली. त्यापैकी सव्वासहाशेवर चारा छावण्या सुरू होऊन सव्वाचार लाखांपर्यंत जनावरांची संख्या गेली; मात्र पाऊस पडला असला तरी म्हणावे तेवढे चारा-पाण्याची उपलब्धता झालेली नाही; मात्र काही ठिकाणी छावणी चालकांनी बंद केल्यामुळे, तर कुठे पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी जावे लागत असल्याने छावण्या बंद होत आहेत. आता अकरा चारा छावण्यांत सात हजार ३०४ जनावरे आहेत. 

विंधनविहिरींची पातळी सुधारली
पावसामुळे विंधनविहिरींच्या पाणीपातळी काही प्रमाणात सुधारली आहे. त्यामुळे टॅंकरची संख्या घटली आहे; मात्र प्रकल्पांची अवस्था तशीच आहे. अद्याप नद्या वाहून तलावांपर्यंत पाणी आलेलेच नाही त्यामुळे तलाव अद्यापही कोरडेठाक आहेत. तलावांतील पाणीपातळी वाढण्यासाठी मोठ्या पावसाची नितांत गरज आहे.

शिरूर तालुक्‍यात ५६ टॅंकर पुन्हा सुरू
शिरूर कासार - तालुक्‍यात यंदा सव्वा महिन्यानंतरही समाधानकारक पाऊस नसल्याने नद्या-नाले, तलावांतील पाणीपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे तालुक्‍यातील सव्वा लाख नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने ३० जूनला सर्वच टॅंकर बंद केले. त्यापैकी ५६ टॅंकर सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. नऊ) दिले आहेत.

शासनाने दुष्काळ परिस्थितीची दखल घेऊन दुष्काळ जाहीर केला. तालुक्‍यातील ५३ ग्रामपंचायतींअंतर्गत वाड्या-वस्तींवर प्रशासनाने ११३ टॅंकरला मंजुरी दिली. त्यामधून १७३ खेपांमधून सव्वा लाख नागरिकांना पाणीपुरवठा सुरू होता. यंदाही जुलैचा पहिला आठवडा संपला तरी समाधानकारक पाऊस नसल्याने नद्या, तलावांतील पाणीपातळीत वाढ झाली नाही. 

यासंदर्भात तालुक्‍यातील ग्रामपंचायतींनी पंचायत समितीला टॅंकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर केले; पण दखल घेतली गेली नाही. आठ-दहा दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करूनही पाणी मिळाले नाही. तहसीलदार किशोर सानप यांनी तत्काळ दखल घेऊन तालुक्‍यातील ५६ टॅंकरचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असून, मंगळवारपासून (ता. नऊ) टॅंकर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

कोळवाडी गावात टॅंकर बंद झाल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पंचायत समितीकडे टॅंकर सुरू करावे म्हणून प्रस्ताव सादर केला. यासंदर्भात गटविकास अधिकारी आर. के. बागडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पंचायत समितीत कोणत्याही कामासाठी पाठपुरावा करण्यात येत नसल्याने कामे मार्गी लागत नाहीत. 
- बाबासाहेब नेटके, सरपंच, कोळवाडी, ता. शिरूर कासार 

शिरूर तालुक्‍यातील भीषण पाणीटंचाई परिस्थितीची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाकडे गावांना बंद केलेले टॅंकर पूर्ववत सुरू करावेत, यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले. त्याचा पाठपुरावा करण्यात आल्याने तालुक्‍यात ५६ टॅंकरला मंजुरी देण्यात आली आहे. 
- किशोर सानप, तहसीलदार, शिरूर कासार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com