रेल्‍वे रुळाने पायी चालत राजस्‍थानी मजूरांचा प्रवास 

rull
rull

हिंगोली ः हिंगोली तालुक्‍यातील कनेरगाव नाका येथे चेकपोस्‍टवर बाहेर राज्यातून आलेल्या वाहनांची तपासणी केली जात आहे. मागच्या काही दिवसांपासून विविध राज्यातील मजूर कामानिमित्त इतरत्र गेल्याने संचारबंदमुळे ते आपल्या गावी परतत आहेत. रविवारी (ता.२०) येथे अडकलेल्या काही राजस्‍थानी मजूरांच्या भोजनाची व्यवस्‍था केल्यानंतर यातील काही मजुर रेल्‍वे रुळाच्या मार्गावरून वाशीमकडे रवाना झाले आहेत.

हिंगोली ते वाशीम मार्गावर कनेरगाव नाका चेकपोस्टवर आठ ट्रकमध्ये प्रवास करणाऱ्या ३९६ कामगारांना शुक्रवारी (ता.२७) दुपारी पकडले होते. हे सर्वजण तेलंगणा व आंध्रप्रदेशातून राजस्थानकडे जात होते. या सर्वांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना हिंगोलीत एका ठिकाणी स्थानबध्द करण्यात आले. त्‍यांना खबरदारी म्‍हणून हिंगोली शहरातील एमआयडीसी भागात ठेवण्यात आले आहे. रविवारी (ता.२९) कनेरगाव नाका येथील चेकपोस्‍टवर परत राजस्‍थानी काही मजुर आले होते. त्‍यांना देखील सीमा बंद असल्याने येथे अडविण्यात आले. त्‍यानंतर ग्रामस्‍थांनी त्‍यांच्या भोजनाची व्यवस्‍था केली. मात्र, यातील काही मजूरांनी रस्‍ते बंद असल्याने या मार्गावर असलेल्या रेल्‍वे रुळाने वाशीमकडे जाण्याचा निर्णय घेतला व ते रवाना देखील झाले आहेत.

कर्मचारी झाले सतर्क 
हिंगोली जिल्ह्यात सीमाबंदी केल्यानंतर जिल्ह्यात येणारे व जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे. तर धान्य, वस्तुंची वाहतूक करणाऱ्या ट्रकची कसून तपासणी केली जात आहे. जिल्ह्यातील सीमांवर कडक पहारा ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधिक्षक योगेशकुमार यांनी दिल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माळी यांनी या कनेरगाव नाका येथील चेकपोस्टला मागच्या दोन दिवसांपुर्वी भेट देऊन पाहणी केली होती. त्यामुळे या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी सतर्क झाले आहेत.

आठ ट्रक घेतले ताब्यात
गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका पाठोपाठ एक असे आठ ट्रक हिंगोलीकडून वाशीमकडे निघाले होते. कनेरनावनाका चेकपोस्टवरील कर्मचाऱ्यांनी ट्रक थांबविल्यानंतर चालकाकडे विचारणा केली. सदर ट्रक तेलंगणा व आंध्रप्रदेशातून राजस्थानकडे जात असल्याचे चालकाने सांगितले. मात्र, ट्रकमधील साहित्याबाबत चालकाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता आतमध्ये लाकडी पाट्या टाकून त्यावर कामगार बसलेले आढळून आले. त्यात एकूण ३९६ कामगार आढळून आले आहे. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

मिळेल त्या रस्त्याने काढला मजूरांनी पळ 
हिंगोलीत ३९६ मजुरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सुरू असताना पुन्हा दोनशे लोकांचा जथा हा कनेरगाव नाका येथेच रविवारी पहाटे पकडण्यात आला. यामध्ये काही महिला मजूर देखील आहेत. मात्र, हे सर्व मजूर चांगलेच संतापलेले होते. पोलिसांनी त्यांना अडवल्यानंतर मिळेल त्या रस्त्याने पळ काढत होते. घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व आरोग्य अधिकाऱ्यांनी धाव घेऊन तपासणीची प्रक्रिया पार पाडली जात आहे. 

मजूरांची प्रशासनाला आर्त हाक
हे मजूर एवढे कंटाळलेत की ते म्हणतात, आम्ही आमचे गाव पायी गाठतो. फक्त परवानगी द्या. आमच्या घरचे खूप प्रतीक्षा करीत आहेत मात्र, परवानगी देताच येत नसल्याचे अधिकारी त्यांना सांगत आहेत. मात्र, यांना इतर जिल्ह्यातून कशी परवानगी दिली जात असावी हा देखील संशोधनाचा विषय आहे. आधीच ताब्यात असलेले मजूर पोलिसांच्या नाकीनऊ आणत आहेत. एमआयडीसी भागात असलेले मजूर देखील रविवारी रस्‍त्यावर येत आम्‍हाला आमच्या घरी जावू द्या असे म्‍हणत होते.

वाहनांनी पुढे जाण्याची व्यवस्‍था नाही
कनेरगाव नाका येथील चेक पोस्टवर रविवारी सकाळी वाहनातून आलेले काही मजूर अडकले होते. त्‍यांच्या भोजनाची ग्रामस्‍थांनी व्यवस्‍था केल्यानंतर आता वाहनांची पुढे जाण्याची व्यवस्‍था नसल्याने काही जाण्याची परवानगी मिळत नसल्याने थेट रेल्वे रुळाच्या मार्गाने कनेरगाव येथून वाशिमकडे रेल्वे ट्रॅकने पायी चालत गेले ते मजूर हैदराबाद, तेलंगणावरून राजस्थान, उत्तरप्रदेशमध्ये आपल्या मूळ गावी जात असल्याचे त्‍या मजुरांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com