
अमित शहा यांना भाषेवरुन देश विभागायचा आहे. असे मत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केले. शहांचा हिंदीबाबतच्या आग्रहावर त्यांनी भाष्य केले. अरुण साधू स्मृति व्याख्यान आणि पाठ्यवृत्ती प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.
औरंगाबाद : दिल्लीच्या हिंदी मीडियातून हिंदू - मुस्लिम, बाबरी मशीद - राम मंदीर यावरुन वातावरण पेटवण्याचा प्रयत्न होतच असतो, आता गृहमंत्री अमित शहा यांना भाषेवरुन देश विभागायचा आहे. असे मत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केले. शहांचा हिंदीबाबतच्या आग्रहावर त्यांनी भाष्य केले. अरुण साधू स्मृति व्याख्यान आणि पाठ्यवृत्ती प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.
एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात शनिवारी (ता. 28) आजची माध्यमे आणि राजकारण या विषयावर राजदीप सरदेसाई यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा खासदास कुमार केतकर होते. श्री. सरदेसाई म्हणाले, ""अरुण साधू यांना महाराष्ट्राच्या राजकारणाची जाण होती, दिल्लीवरुन येणारे पत्रकार पॅराशुट पत्रकारिता करत वाद निर्माण करतात. अमित शहांनीही नुकतेच हिंदी भाषेच्या सक्तीबाबत विधान केले होते. त्यांना लोकांचे भाषेतून विभाजन करायचे आहे. शहांना चेन्नई, बंगलोर, विजयवाडा येथे घेऊन जा. तिथे हिंदीमध्ये भाषणे करायला सांगा.'' अशी उपरोधिक टीका सरदेसाई यांनी केली.
"पत्रकारितेत देशभक्ती नाही, देशभक्ती करायची तर, लष्करात जा. पत्रकारिता करायची तर, प्रश्न विचारा.'' असा सल्ला त्यांनी पत्रकारितेतील विद्यार्थ्यांना दिला. काश्मिरात पत्रकारांचे फोन बंद करणे, ही सरकारची सेन्सरशीप आहे. देशाचे पंतप्रधान एकांगी संवाद साधत आहेत. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारला कि, पाकिस्तानला जाण्याचा सल्ला देतात. निवडणुकांत फेक न्युजसाठी एकेका राज्यात 30 हजार व्हॉटसऍप ग्रुप करतात. त्याद्वारे बुद्धीभेद केला जातो. यावर पत्रकारितेत नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांनी "फेक न्युज बस्टर' सुरु करावे.'' टीव्ही मीडिया संपून मोबाईल पत्रकारिता येत असून ती आत्मसात करण्याचा सल्ला दिला.
पुलवामा घडले नसते तरी, मोदी जिंकले असते
विद्यार्थ्यांकडून आलेल्या प्रश्नावर सरदेसाई म्हणाले, पुलवामा घडले नसते तरी, नरेंद्र मोदी जिंकले असते. मोदी, मीडिया, मशीन, मेसेज असे त्यांचे सुत्रच आहे. पत्रकारांनी जे सत्तेत आहेत, त्यांनाच प्रश्न विचारले पाहिजेत. मात्र, आजच्या काळात विरोधकांनाच प्रश्न विचारले जात आहेत. टीव्ही अँकर पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहेत. देशभक्तीसाठी छाती 56 इंचाची नाही तर, हृदय मोठे असायला हवे. असा चिमटा त्यांनी पंतप्रधानांना काढला.