राम कदमांचे उत्तर आले, पण सांगू शकत नाही
औरंगाबाद - दहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांबद्दल असभ्य टिप्पणी करणाऱ्या आमदार राम कदम यांच्याविरुद्ध राज्यभरातून टीकेची झोड उठविल्यानंतर जाग आलेल्या महिला आयोगाने नोटीस बजावली. दरम्यान, या नोटिशीला त्यांनी उत्तर दिले असून, त्यातील मजकूर सांगू शकत नाही. कायदेशीर बाजू तपासण्यात येत आहेत, असे उत्तर देत महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी बचावात्मक पवित्रा घेतल्याचे समोर आले आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिद्धार्थ उद्यानात सोमवारी (ता. १७) अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी ‘आमदार कदम यांना महिलांबद्दलच्या वक्तव्याबद्दल दिलेल्या नोटिशीला उत्तर आले का’, याची विचारणा केली असता, राहाटकर म्हणाल्या, ‘‘आपण पाठविलेल्या नोटिशीला त्यांनी उत्तर दिले आहे; मात्र त्यात त्यांनी काय म्हटले हे सांगता येणार नाही. त्या वक्तव्याचा अभ्यास केला जात असून, कायदेशीर बाजू तपासल्या जाणार आहेत.’’ ‘त्याला नेमका किती दिवसांचा वेळ लागेल?’ असे विचारले असता, ‘‘ते काहीच सांगता येणार नाही’’, असे उत्तर त्यांनी दिले.
महिलांचा सन्मान राखण्यासाठी आयोग पूर्ण क्षमतेने कार्य करीत आहे. चुकीचे वर्तन खपून घेणार नसल्याचे सांगत त्यांनी कदम प्रकरणी कायद्यातील तरतुदींचा अभ्यास सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्या म्हणाल्या.