शेतकरीपुत्र ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

देवणी - सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष हा रामचंद्र तिरुके यांचा संघर्षमय प्रवास थक्क करणारा आहे. नवख्या मतदारसंघात येऊनही विजय मिळवीत तिरुके यांनी उपाध्यक्षद मिळविले आहे.

देवणी - सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष हा रामचंद्र तिरुके यांचा संघर्षमय प्रवास थक्क करणारा आहे. नवख्या मतदारसंघात येऊनही विजय मिळवीत तिरुके यांनी उपाध्यक्षद मिळविले आहे.

वलांडी गटातील जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके यांची जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी निवड झाल्याने वलांडीला पहिल्यांदाचा राजयोग लाभला आहे. तिरुके यांच्या रूपाने तालुक्‍याला दुसऱ्यांदा, तर वलांडीला पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. रामचंद्र पंढरीनाथ तिरुके यांचे मूळ गाव उदगीर तालुक्‍यातील सताळा. वडील पंढरीनाथ तिरुके हे स्वांतत्र्यसैनिक व शेतकरी. पंढरीनाथ तिरुके यांना दोन मुले. त्यात ज्येष्ठ रामचंद्र तिरुके राजकारणात, तर लहान भाऊ भरत तिरुके राजकारणापासून दूर शासकीय नोकरीत कार्यरत. संयुक्त कुटुंबाची ३२ एकर शेती. दोन मुली अश्विनी व मोहिनी आणि पत्नी मंगलताई हे रामचंद्र तिरुके यांचे कुटुंब. 

रामचंद्र तिरुके यांनी वीस वर्षंपूर्वी सताळा गावातून ग्रामंपचायत निवडणूक लढविली; मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. आत्मपरीक्षणातून सुधारणा करीत त्यांनी गावातील सक्रिय राजकारणात सहभाग घेतला. त्यानंतरच्या टर्ममध्ये गावाने त्यांच्या पत्नी मंगलताई तिरुके यांना बिनविरोध सरपंच केले. शिवाय गेल्या पंधरा वर्षांत गावात ग्रामपंचायतीची निवडणूकच झाली नाही. सर्व निवडणुका बिनविरोध करीत तिरुके यांनी पहिल्यांदा गावावर पकड मजबूत केली. 

२००७ मध्ये रामचंद्र तिरुके यांनी देवर्जन गटातून निवडणूक लढविली. त्यात त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर २००७ ते २०१२ या पाच वर्षांत त्यांनी जनतेच्या नियमित संपर्कात राहत विकासकामे केली. त्यामुळेच २०१२ मध्ये नवख्या असलेल्या तोंडार गटातून त्यांचा विजय झाला. जिल्ह्यातील २५०० पेक्षा अधिक व्यक्तींच्या दुर्धर आजारावर उपचार करून त्यांना आधार देण्याचे काम तिरुके यांनी केलेले आहे. चालू निवडणुकीत त्यांना उदगीरऐवजी देवणी तालुक्‍यातील वलांडी गटातून भाजपकडून तिकीट मिळाले. नवखा तालुक्‍यात त्यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर होऊनही वेगवान प्रचारयंत्रणा, भाजपची लाट, संभाजीराव पाटील निलंगेकर व अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नियोजनाचा लाभ मिळवीत त्यांनी तब्बल साडेतीन हजार मतांनी विजय मिळविला.

Web Title: Ramchandra tiruke vice president zp