मध्यावधी निवडणुकीसाठी शिवसेना कधीही सज्ज- रामदास कदम

शिवचरण वावळे
शुक्रवार, 9 जून 2017

केवळ शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच शिवसेना सत्तेत असल्याचे सांगत मध्यावधी निवडणुकीसाठी शिवसेना कधीही सज्ज असल्याचा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिला आहे.

नांदेड - केवळ शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच शिवसेना सत्तेत असल्याचे सांगत मध्यावधी निवडणुकीसाठी शिवसेना कधीही सज्ज असल्याचा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिला आहे. पेरणीचे हंगाम सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे लेखी आश्‍वासन सभागृहात दिले होते, असेही कदम यांनी यावेळी सांगितले.

कदम सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज (शुक्रवार) शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकारपरिषदेत कदम बोलत होते. नांदेड जिल्ह्याच्या अचानक दौऱ्याचे कारण विचारले असताना 'शिवसेनेच्यावतीने शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. पक्षाला अपेक्षित असलेले काम जिल्ह्यात सुरू आहे किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी आजपासून अठरा तारखेपर्यंत खानदेशाच्या दौऱ्यावर आहे' अशी माहिती त्यांनी दिली. शेतकरी संपाबाबत बोलताना त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. 'काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सध्या नौटंकी आंदोलन सुरू आहे. दिवसा शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन शेतकऱ्यांना एक सांगायचे आणि दुसरीकडे आम्ही तुमच्या सोबत आहोत असे पंतप्रधानांच्या कानात जाऊन सांगायचे अशा लोकांना आंदोलनाचा नैतिक अधिकारच नाही', असे म्हणत कदम यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शिवसेना कधी एकदा सत्तेतून बाहेर पडते आणि आम्ही सत्तेत जातो याची ते वाट पाहत असल्याची टीकाही त्यांनी केली. 'आम्हाला दुसऱ्यांच्या सल्ल्याची गरज नसून सत्तेतून बाहेर पडण्यासाठी पक्षश्रेष्ठी योग्य वेळी निर्णय घेतील', असेही ते म्हणाले. मध्यावधी निवडणुकांबाबत बोलतना ते म्हणाले, 'मी जोशी नाही; की जोतिषी नाही. त्यामुळे मध्यावधी कधी लागणार हे सांगता येणार नाही. परंतु राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची हेळसांड होत असले आणि सरकार शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला जात नसेल, तर शिवसेना सत्तेला कधीही लाथ मारु शकते.'

यावेळी या वेळी शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील, आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, प्रकाश मारावार यांची उपस्थिती होती.

 

Web Title: ramdas kadam marathi news maharashtra news shivsena nanded news