रमेश कदम यांना न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

उस्मानाबाद - अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील जवळपास वीस लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी ताब्यात असलेले निलंबित आमदार रमेश कदम यांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून ठाणे येथील कारागृह प्रशासनाच्या ताब्यात दिले जाणार आहे.

अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांना पोलिसांनी काल ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांच्या वतीने त्यांना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आनंदनगर पोलिस ठाण्यातून जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती, त्यामुळे पुन्हा आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळांतर्गत बोगस लाभार्थी दाखवून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोट्यवधींचा गैरव्यवहार करण्यात आला होता. याप्रकरणी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांनाही अटक करण्यात आली होती. वेगवेगळ्या जिल्ह्यांत त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत आहे. उस्मानाबादेत कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर व न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने पुन्हा रमेश कदम यांना ठाणे कारागृह प्रशासनाच्या हवाली केले जाणार आहे.

Web Title: ramesh kadam custody crime