बोर्डीकरांचा भाजप प्रवेश निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

कॉंग्रेसला रामराम; परभणीत लवकरच सोहळा

कॉंग्रेसला रामराम; परभणीत लवकरच सोहळा
परभणी - कॉंग्रेसचे नेते, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाला आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा परभणीत प्रवेश सोहळा होणार आहे. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील कॉंग्रेसचे अन्य नेतेही भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती बोर्डीकर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

परभणी जिल्ह्यात कॉंग्रेसचे बडे नेते म्हणून रामप्रसाद बोर्डीकर यांच्याकडे पाहिले जाते. जिंतूर विधानसभेवर सलग चारवेळा निवडून आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापन झाल्यावर बोर्डीकर हे या पक्षात गेले होते. परंतु तेथे त्यांचे मन रमले नाही आणि पुन्हा कॉंग्रेसमध्ये परतले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. जिल्हा परिषद निवडणुकीतही त्यांचा फारसा करिश्‍मा चालला नाही. ते कॉंग्रेस सोडणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. त्यांचे निकटवर्तीय असलेले प्रभाकर वाघीकर हे शिवसेनेत गेल्यानंतर रामप्रसाद बोर्डीकर हेदेखील शिवसेनेत येणार असल्याची चर्चा होत होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांची कन्या मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार कुंडलिकराव नागरे, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील (अहमदपूर) उपस्थित होते.

भाजप प्रवेशाचा निर्णय निश्‍चित झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेटही घेतली आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री परभणीत येतील तेव्हा प्रवेश सोहळा होईल. त्यावेळी जिल्ह्यातील कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करतील.
- रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार, जिंतूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramprasad bordikar bjp entry final