दानवे यांच्या वक्तव्यावर शेतकऱ्यांमध्ये संताप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

नांदेडः तुरीचा प्रश्न आधीच चिघळलेला असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. जालन्याचे पालकमंत्री आणि स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी रावसाहेब दानवेंची जीभ घसरली.

ते म्हणाले, 'आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त तूर भाजप सरकारने खरेदी केली, अजून एक लाख टन तूर खरेदी करणार आहे, तरी रडतात...' या वक्तव्यावर शहरासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

शेतमालाला असलेल्या कमी भावामुळे शेतकरी आधीच चिंताग्रस्त आहेत. बऱ्याच ठिकाणी उत्पादन खर्चही निघाला नाही. अशा परिस्थितीत खरीप हंगामासाठी पैसे कोठून आणायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. याशिवाय मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण, दैनंदिन खर्च कसा भागवावा, या विवंचनेत तालुक्‍यातील शेतकरी आहेत. रावसाहेब दानवे यांनी उपरोक्त वक्तव्य करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ते कार्यकर्त्याला म्हणाले, ''तू जास्त पेपर वाचतो का? वाचत जाऊ नको, तूर, कापूस, ऊस, बाजरी खरेदी हा विषय आता बंद करा'' या वक्तव्याने देखील शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

काय म्हणतात शेतकरी...
रावसाहेब दानवे यांनी केलेले वक्तव्य प्रत्येक शेतकऱ्याचे मनोधैर्य खचविणारे आहे. रक्ताचा घाम करून पिकवलेली तूर जेव्हा घरात पडून सडते तेव्हा त्यांच्यावर काय आघात होत असेल याची जाणीव एसीमध्ये बसून कशी येईल? ज्या कामासाठी नेत्यांना निवडून दिले आहे, त्याचेच उपकार या प्रकारच्या वक्तव्यातून ते दाखवित आहेत.
- गणेश कावरे

सरकारच्या शेतकरी विरोधी कायदे, धोरणांमुळेच शेतकरी बेजार झाला आहे. अशा परिस्थितीत स्वतःची चूक सुधारण्याचे सोडून सत्तेतील नेते बेताल वक्तव्य करीत आहेत. शेतकऱ्यांच्या दुःखाश्रूचे राजकीय भांडवल करण्याचा हा प्रयत्न आहे. अशा नेत्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी.
- दादाराव देशमुख

सरकारनेच तूर उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे जेवढी तूर झाली ती खरेदी करण्याची जबाबदारी पूर्णतः सरकारची आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या घरातील तुरीचा प्रत्येक दाना विक्री होणार नाही तोपर्यंत तूर खरेदी सुरू ठेवणे सरकारचे कर्तव्य असल्याची जाण रावसाहेब दानवेला असायला हवी होती.
- गणेश नानोटे

Web Title: raosaheb danve's statement and farmer