औरंगाबाद - वडापावच्या आमिषाने चिमुकलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - सहा दिवसांपूर्वीच घराशेजारी राहायला आलेल्या मजुराने सात वर्षीय मुलीला वडापावचे आमिष दाखवून आईसमोरून गिरनेर तांडा येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तो पसार झाला. ही गंभीर घटना मंगळवारी (ता. ३१) सकाळी उघडकीस आली. या संशयिताला अटक करण्यात आली.

बंडू रोहिदास राठोड (वय ३५, रा. बिन्नीतांडा, ता. पैठण) असे संशयिताचे नाव आहे. 

तो केटरिंगचे तसेच मजुरीकाम करतो. मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात पाच ते सहा दिवसांपूर्वी तो राहण्यासाठी आला. यानंतर त्याची शेजारील पीडित मुलीच्या आईशी ओळख झाली. सोमवारी रात्री आईसमोरच राठोडने मुलीला वडापाव घेऊन देतो असे सांगून नेले; पण तो घरी परतला नाही. रात्र उलटली तरीही तो न आल्याने आई घाबरली; पण राठोड मुलीला घरी घेऊन येईल या विश्‍वासाने तिने पोलिस ठाण्यात तक्रारही केली नाही. पैठण रोडवरील गिरनेर तांडा येथील एका शेतात मुलगी आढळल्याची बाब तांड्याच्या पोलिसपाटलांनी चिकलठाणा पोलिसांना दिली. यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी गिरनेर तांडा येथे जाऊन मुलीची चौकशी केली; परंतु तिच्याकडून पूर्ण माहिती मिळत नव्हती. मुलीची ताईतवाले यांनी घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. दरम्यान तिच्यावर राठोड नामक व्यक्तीने अत्याचार केल्याची बाब समोर आली.

मुलीच्या पालकांचा शोध घेतल्यानंतर तिची आईचा संपर्क झाला. मुलीवर अत्याचार झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार, बाललैंगिक शोषण विरोधी कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद झाली.

संशयिताला बेड्या
चिकलठाणा ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर तो मुकुंदवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. यानंतर संशयिताचा शोध घेतला असता तो करमाड येथील एका इमारतीच्या सेंट्रिंग कामासाठी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक नाथा जाधव, जमादार जनार्दन निकम, असलम शेख यांनी केली.

Web Title: rape on girl crime