राष्ट्रधर्माचे चालते-बोलते मूर्तस्वरूप - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

tukdoji maharaj.jpg
tukdoji maharaj.jpg

नांदेड : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज १११ वी जयंती आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील ‘यावली’ या गावी ३० एप्रिल १९०९ मध्ये आई मंजुळा व वडील बंडोजी यांच्या पोटी झाला. त्यांचे बालपणीचे नाव ‘माणिक’ असे होते. तुकडोजींच्या जन्माच्या वेळी त्यांच्या झोपडी वरील छप्पर अचानक वादळाने उडून गेले. पुढे आपल्या डोक्यावर आकाशाचे छत घेऊन गावोगावी भटकंती करणाऱ्या माणिकसाठी तो एक संकेत ठरला. त्यांचे वडील गुळाचा व्यापार व शिंपीकाम करीत असत. आई दळण-कांडण करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे. वारकरी संतांच्या कृतिशीलतेचा संस्कार त्यांच्यावर होत होता. 

माणिकचा झाला तुकड्या
माणिकच्या मामाचे गाव अमरावती जिल्ह्यातील वरखेड होते. माणिक आजोळी गेल्यानंतर आईने तेथील साधू पुरुष आडकूजी महाराज यांच्या दर्शनासाठी नेले अडकुजी महाराजांनी माणिकला भाकरीचे तुकडे खाऊ घातले. त्यावेळी ‘तुकड्या-तुकड्या’ असे शब्द त्यांच्या तोंडून निघाले. ते ऐकून तेथे उपस्थित असणारे त्याला ‘माणिक’ या नावाऐवजी ‘तुकड्या’ या नावाने संबोधू लागले. तेव्हापासून माणिकचा ‘तुकड्या’ झाला. 

व्यक्तिमत्त्व झाले प्रगल्भ
बंडोजींनी तुकड्याला शिकण्याकरिता शाळेत घातले. पण शाळेपेक्षा गावातील मंदिरात जाऊन ध्यान करणे त्याला आवडत असे. त्यामुळे त्याला वडिलांच्या हातचा मारही बरेचदा मिळे. दुसऱ्या वर्गात शिकत असताना तुकड्याला गावात आलेल्या सातळीकोतळीकर महाराजांचा सहवास लाभला. त्यांनी आपल्याकडील पुस्तके त्याला वाचायला दिली. ती वाचून त्याच्या मनात वैराग्य निर्माण झाले. बंडोजींनी त्याला चांदूरबाजार येथील शाळेत शिकायला पाठविले. तेथे गायन कलेत निपुण अशा भारतीबुवांचे मार्गदर्शन त्याला मिळाले. गायनाचे प्राथमिक धडे त्यांच्याकडून माणिकने घेतले. वरखेडला मुख्याध्यापकांशी  अनेक विषयावर तो चर्चा करीत असे. त्यांच्याकडूनही त्याला मौलिक पुस्तके वाचायला मिळाली त्यातून तुकड्याचे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ झाले. 

गरजू लोकांना मदत करण्याची आवड
गरजू लोकांना मदत करणे तुकड्याला अतिशय आवडत असे. त्याचबरोबर काव्यरचना करण्याचे कौशल्यही त्यांने आत्मसात केले होते. त्यामुळे त्याचे मित्र त्याचा हेवा करीत असत. नातलगांसह शेजारीपाजारी त्याची हेटाळणी करीत असत. ती सहन न होऊन तुकड्याने घरदार सोडले. अमरावती जवळील बडनेरा या गावापाशी कोंडेश्वर नावाचे एक शिवालय आहे. तेथे तो महादेवाच्या भक्तीत रमला. १९२० च्या सुमारास मुंगळे येथील उद्धव महाराजांनी चातुर्मासाच्या कार्यक्रमात त्याला सहभागी करून घेतले. त्याचा जाहीर सत्कार केला. त्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला.

वयाच्या चौदाव्या वर्षी गाव सोडले
वरखेडला असताना अडकोजी महाराजांसमोर तुकड्या भजन करीत असे. त्यांच्या सानिध्यात संत तुकारामांचे नाव जोडून स्वतः माणिक अभंग रचना करायला लागला. तेव्हा ‘तुकड्या’ हे नाव जोडण्याची आज्ञा अडकोजी महाराजांनी त्याला केली. ‘तुका म्हणे’ च्या ऐवजी ‘तुकड्या म्हणे’ शब्द त्यांच्या अभंगात नंतर येऊ लागले. तुकाराम महाराजांच्या अभंगाचा त्यांच्यावर प्रभाव होता. १९२१ मध्ये अडकोजी महाराजांचे निधन झाले. आपला भावनिक आधार नष्ट झाल्याची भावना झालेल्या तुकड्याने पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्यामुळे मनात दाटलेले सारे दुःख अश्रूंच्या रुपात बाहेर पडले. पुंडलिक हा त्याला आदर्श वाटू लागला. त्यामुळे तेथून परत यावलीस येऊन त्याने माता-पित्यांची सेवा सुरू केली. काही दिवसानंतर वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने कंटाळून आपले गाव सोडले. 

रामदिधी जंगलात केली तपश्चर्या 
घर सोडल्यानंतर तुकड्याने चंद्रपूर जिल्ह्यातील रामदिधी जंगलात तपश्चर्या केली. रानटी पशूंच्या सहवासात असताना एक योगी त्याला भेटला. त्याच्याकडून योगमार्गाचे ज्ञान त्याला मिळाले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा, गोदुंडा या अरण्यामध्ये त्याने योगाभ्यास केला. यावेळी तेथील आदिवासींचे जीवन त्याला जवळून पाहता आले. अशा अनेक अनुभवांच्या भट्टी तावून- सुलाखून निघालेल्या तुकड्याला ईश्वर मंदिरात नसून माणसात शोधण्याचा ध्यास लागला. दुःखी, कष्टी लोकांची सेवा करून त्यांच्या वेडगळ समजुती नाहीशा करणे हे त्याने आपले जीवित कार्य मानले. आपल्या मुलाला वाघाने खाल्ले अशी अफवा ऐकून बंडोजी त्याला शोधायला चिमूरला गेले. तेव्हा तो त्यांना आदिवासींच्या सहवासात आढळला. योगाभ्यास व तपश्चर्या या दोन महत्त्वाच्या गोष्टींना आदिवासींच्या सेवेचे कोंदण लाभले. त्यामुळे तुकड्या आदिवासींच्या गळ्यातील ताईत बनला. 

भारतभर केला प्रवास 
१९२५ मध्ये तुकड्याने भारतभर प्रवास केला. अनेक प्रकारच्या साधू संतांचा सहवास तीर्थयात्रेच्या निमित्ताने त्याला लाभला. त्यातून ढोंगी साधू विषयी तिरस्काराची भावना त्याच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे त्यांच्या सारखे राहण्यापेक्षा साधी राहणी त्यानी पत्कारली. त्यांच्या या साधेपणाचा प्रभाव आचार्य प्र. के. अत्रे डाॅ. वि. भि. कोलते यांच्या सारख्या विद्वानावर पडला. समाज जागृतीत व्यस्त असलेल्या तुकड्याने जाहीर भजनांचे कार्यक्रम केलेत. समाजाला खडबडून जागे करून त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागविणे  आणि जुलमी इंग्रज राजवट उलथवून टाकणे  हे त्याचे ध्येय ठरले. या काळातील त्यांचे एक गीत खूप गाजले ते असे, ‘उठो जवानों करके बताओ, कहने के दिन गये.’ युवा पिढीला स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी रचलेले हे गीत स्वातंत्र्यचळवळीत चैतन्य निर्माण करणारे ठरले. आपल्या पहाडी आवाजात खंजरीच्या तालावर गायलेल्या त्यांच्या गीतांनी श्रोत्यांची मने झंकारली होती. त्यांच्या गीतांमध्ये हे सामर्थ्य होते की त्यांच्या खंजिरीमध्ये असा प्रश्न एका महिलेला पडला. अमेरिकेतील केन्सान युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका मिस काझार्ड यांनी तुकडोजी पासून प्रेरणा घेऊन खंजिरी वाजवून नृत्य केले होते. जगभरातील श्रोत्यांना खंजरीविषयी कुतूहल निर्माण झाले. जपानमधील विश्वधर्म संमेलनात खंजिरीवर सहजपणे फिरणाऱ्या तुकडोजींच्या बोटांचे कौशल्य हे चर्चेचा विषय ठरले होते. एका साध्या वाद्याला तुकडोजीमुळे प्रतिष्ठा मिळाली.

महात्मा गांधींच्या चळवळीत मोलाची भर 
काव्यरचना, गायन कौशल्य तसेच राष्ट्रप्रेम या गुणांसोबतच शरीर सौष्ठत्व हे तुकडोजींचे वैशिष्ट्य होते. पोहणे आणि घोड्यावर बसणे त्यांना अतिशय आवडत असे. पहाटे उठून स्नान करणे, सामुदायिक प्रार्थना व ध्यान, रामधून, सूतकताई, श्रमदान उपस्थितांना मार्गदर्शन आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे असा त्यांचा दिनक्रम होता. प्रवासातही ते त्यात खंड पडू देत नसत. त्यामुळे त्यांचा प्रभाव त्यांच्या सहवासातील लोकांवर पडणे स्वाभाविक होते. महात्मा गांधींच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत मोलाची भर टाकणाऱ्या तुकडोजींनी आपल्या कार्याला स्थिरस्वरूप देण्याकरिता एखादे केंद्र स्थापण्याचे ठरविले.

‘गुरुदेव सेवाश्रमा’ची स्थापना
वर्धा जिल्ह्यातील आष्टी या गावी त्यांनी आरतीमंडळ स्थापन केले होते. त्याचेच रूपांतर पुढे ‘गुरुदेव सेवाश्रम’ या संस्थेत झाले. तेथून जवळच नागपूर-मुंबई महामार्गावर असलेल्या ‘मोझरी’ या अमरावती जिल्ह्यातील गावात या संस्थेचे केंद्र स्थापन केले. १९३७ मध्ये स्थापन केलेल्या या केंद्रात ग्रंथ प्रकाशनाचाही प्रारंभ झाला. या परिसरातील तरुणांनी राष्ट्रसंतांच्या प्रभावातून ‘तेजस्वी तरुण संघटना’ स्थापन केली. संघटनांमधील तरुणांनाही तुकडोजींनी स्वातंत्र्यचळवळीत येण्याचे आवाहन केले. जे कार्यकर्ते भूमिगत राहून हे कार्य करीत त्यांना तुकडोजींनी मदत केली. 

१९४२ च्या आंदोलनात उडी 
महात्मा गांधीच्या ‘अँग्रेजो भारत छोडो’ या घोषणेला सक्रिय प्रतिसाद देत तुकडोजींचे १९४२ च्या आंदोलनात उडी घेतली. गावोगावी जाऊन त्यांनी राष्ट्रभक्तीपर भजने गाऊन युवा पिढीमध्ये स्वातंत्र्यप्रेम जागविले. त्यामुळे विदर्भातील स्वातंत्र्य चळवळीत चैतन्य संचारले. परिणामी ‘गुरुदेव सेवाश्रम’ हे इंग्रजांच्या रोषास कारणीभूत ठरले. गावोगावच्या उपासक- प्रचारकांची धरपकड सुरू झाली. आष्टी, चिमूर, यावली येथील कार्यकर्त्यांना यात आपले प्राणही गमवावे लागले. चंद्रपूर येथे चातुर्मासानिमित्त नामसप्ताहास जमलेल्या भाविकांपुढे तुकडोजींनी स्वातंत्र्याचे महत्त्व सांगितले. प्रवचन चालू असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली. आष्टी-चिमूर संग्रामातील लोकांना भडकावण्याचा आरोप लावून त्यांना बेमुदत बंदिस्त ठेवण्याचा आदेश दिला गेला. पण जनतेच्या रेट्यामुळे सरकार झुकले आणि अवघ्या चार महिन्यात तुकडोजींचे सुटका झाली.

महिला मंडळाची स्थापना 
स्वातंत्र्यचळवळीत चैतन्य निर्माण करणारे ‘आते है नाथ हमारे’ हे गीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांना उद्देशून तुकडोजींनी रचले होते.‘पत्थर सारे बम बनेंगे’ ही  या गीतातील ओळ म्हणजे इंग्रजी राजवटीला दिलेली धमकी होती. क्रांतिकारकांना त्यापासून प्रेरणा मिळाली. या वास्तवाची जाणीव झालेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी तुकडोजींच्या या भजनावर बंदी घातली. आपल्या विचारांच्या प्रसारासाठी १९४३ मध्ये तुकडोजींनी ‘गुरुदेव’ या मासिकाचे प्रकाशन सुरू केले. विश्वशांती नामसप्ताहाचे आयोजनही याच दरम्यान त्यांनी केले होते. ते महिलांच्या सन्मानाचा संदेश जनमानसात रुजावा याकरिता तुकडोजींनी महिला मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या वतीने महिलांना स्वावलंबी बनविण्याकरिता लघु उद्योगासाठी प्रेरित केले. त्यासाठी त्यांनी गावोगावी प्रचार वर्ग घेतले. त्यातून तयार झालेल्या महिलांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला. अनेक निराधार महिलांनाही त्यांनी आधार दिला. युवा पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्याकरिता १९४५ मध्ये आखाडे निर्माण केले. नागपूरमध्ये सर्व आखाड्यांना संघटित करून त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागविण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. युवका प्रमाणेच साधूंचे संघटन करून त्यांनाही राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी करून घेतले. 

भजन मंडळीसह जनजागरण मोहीम
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते टिकावे यासाठी राजकारणापासून दूर राहून तुकडोजींनी राष्ट्रापुढील अनेक समस्या सोडविण्यात राज्यकर्त्यांना मदत केली. हैदराबादचा निजाम स्वतंत्र भारतात सामील न होता पाकिस्तानमध्ये आपले संस्थान सामील करण्याच्या वल्गना करीत होता. अशा अचानक आलेल्या संकटावर मात करण्याकरिता तुकडोजींनी राष्ट्रभक्त तरुणांची फळी बनवून देशाला मदत करण्याचे ठरविले. यासाठी स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी आपल्या भजन मंडळीसह हैदराबादच्या सरहद्दीवरील गावांमध्ये जनजागरण मोहीम सुरू केली. महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वराज्याची संकल्पना जनमानसात रुजविणे हा त्यामागील हेतू होता.

रझाकारांना पिटाळून लावले
हैदराबादच्या निजामाची बाजू घेणाऱ्या रझाकारांच्या विरोधात सर्वसामान्यांची शक्ती एकवटुन त्यांनी त्यांना पिटाळून लावले. गावोगावी शिबिरे घेऊन तरुणाईला जागवून नव्या सरकार पुढील एक मोठे संकट दूर करण्यात तुकडोजींनी राष्ट्रकार्यातील आपला वाटा उचलला. १९६२ मध्ये सारे भारतीय दिवाळी साजरी करण्यात व्यस्त असताना चीनने भारतावर आक्रमण केले. भारतीय सैन्य त्याचा मुकाबला प्रभावीपणे करू शकले नाही. कारण त्यांच्याकडील शस्त्रे १८५७ मधील होती. ‘चिनी हिंदी भाई भाई’च्या घोषणा देत चीनने भारताचा विश्वासघात केला होता. अशावेळी भारतीय सैन्याला दिलासा देण्याकरिता निधी गोळा करण्याचे कार्य तुकडोजी महाराजांनी केले. १९६५ साली पाकिस्तानने भारताशी युद्ध छेडल्यावर राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी लोकांनी प्रवृत्त व्हावे म्हणून तुकडोजी महाराजांनी दौरा काढला होता. धार्मिक पिंड असलेल्या तुकडोजी महाराजांनी समाजकारण व राजकारण या क्षेत्रावरही आपला प्रभाव गाजविला होता. महात्मा गांधीच्या ग्रामस्वराज्याचे स्वप्न साकारण्याच्या हेतूने त्यांनी ग्रामसुधार, यात्रासुधार ही कार्य हाती घेतली. १९५४ साली गुरुकुंज आश्रमात त्यांनी ‘शांतीदूत संमेलन’ याच दृष्टीने आयोजित केले होते. 

भूदान आंदोलनात पदयात्रा
आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनात पदयात्रा काढून त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. १९५५ मध्ये जपानमध्ये भरलेल्या विश्वशांती व विश्वधर्म परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या सर्वसमावेशक भूमिकेमुळे १८ देशांचे प्रमुख सल्लागार म्हणून त्यांची अविरोध निवड झाली होती. यावेळी उपस्थित प्रतिनिधी बरोबर त्यांनी भगवान बुद्धांच्या विश्वशांतीच्या तत्वांची शिकवण देणारा ‘पंचशील प्रस्ताव’ मांडला होता. पंडित जवाहरलाल नेहरूंची प्रेरणा यामागे असल्यामुळे उपस्थितांनी त्यावर आक्षेप घेतला होता ; परंतु तुकडोजींनी त्यामागील हेतू प्रभावीपणे कथन केल्यामुळे तो सर्वांना पटला. भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू आणि पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी जपान व ब्रह्मदेशाचा दौरा करून आलेल्या तुकडोजींचे उत्स्फुर्तपणे स्वागत केले. पंचशील करार करून तो न पाळल्याबद्दल चीनविरोधी वातावरण तयार करण्यात राष्ट्रसंतांनी पुढाकार घेतला. धर्म व राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे त्यांनी यातून सिद्ध केले. ग्रामगीतेतून त्यांच्या या चिंतनाचे स्वरूप स्पष्ट होते. पुढे संत गाडगेबाबांच्या स्वच्छता मोहिमेत भाग घेऊन धर्मशाळा उभारण्याच्या कार्यातही त्यांनी तन-मन-धनाने मदत केली होती. १९५८ ते ५९ या काळात त्यांनी गाडगेबाबांचे अपूर्ण काम पूर्ण केले. वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांनी बरेच उपक्रम सोबत राबविले. तुकडोजी त्यांना आपल्या गुरू स्थानी मानत असत.

ग्रामगीता झाली खेड्याची ज्ञानेश्वरी
तुकडोजी महाराजांनी लिहीलेल्या ग्रामगीते विषयी संत गाडगे बाबा म्हणतात की, ‘तुकडोजी बाबांची ग्रामगीता ही आज गीता ज्ञानेश्वरी प्रमाणे खरं ज्ञान देऊन खेड्यापाड्यात, झोपडी-झोपडीत सुख-समाधान पैदा करील असा भरवसा वाटतो. आज अशा ग्रंथांची गावोगावी गरज आहे. या ग्रंथापासून साध्याभोळ्या समाजाला ज्ञान मिळून त्यांच्या हातून त्यांचं दुःख,दैन्य दूर होण्याचं भाग्य त्यांना मिळू शकेल, इतकं याचं महत्त्व आहे. १९६७ साली महात्मा गांधी जन्मशताब्दी निमित्त ४५ वे अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन व अखिल भारतीय संगीत शिबीर राष्टसंत तुकडोजी महाराजांनी आयोजित केले होते. व्यर्थ कर्मकांडाला टाळून विवाह तसेच अंत्यसंस्कारासाठी ‘सर्व तीर्थकुंड’ निर्माण केले. या उपक्रमात व्यस्त असल्याने स्वतःकडे दुर्लक्ष झाले.त्यांना शेवटी कर्करोगाने ग्रासले व ११आॅक्टोंबर १९६८ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या स्मृती कार्याच्या रूपाने आजही कायम आहेत.
अशा महान राष्ट्रसंतास कोटी कोटी विनम्र अभिवादन! 

रमेश पवार 
(लेखक,व्याख्याते)
बहीशाल शिक्षण केंद्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. 
(मो.७५८८४२६५२१)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com