मुलाचा मृतदेह रस्त्यावर ठेऊन रास्ता रोको आंदोलन

अर्जुन सुतार
बुधवार, 4 एप्रिल 2018

कारच्या धडकेत एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईक व ग्रामस्थांनी सायंकाळी पाचच्या सुमारास या मुलाचा मृतदेह महामार्गावर ठेवून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.

येडशी (जि. उस्मानाबाद) - राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना कारच्या धडकेत एका शाळकरी मुलाचा बुधवारी (ता. 4) सकाळी साडेअकराच्या सुमारास मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईक व ग्रामस्थांनी सायंकाळी पाचच्या सुमारास या मुलाचा मृतदेह महामार्गावर ठेवून येडशी (जि. उस्मानाबाद) येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजुंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील येडशी (ता. उस्मानाबाद) येथील सोनेगाव- येडशी चौकात बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर संदेश यशवंत गव्हार (वय 8) आणि सायली यशवंत गव्हार (वय 5) या दोघांना घेऊन त्यांचे पणजोबा मुरलीधर गव्हार हे घराकडे निघाले होते. हे तिघेही राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना उस्मानाबादकडे निघालेल्या भरधाव कारने (एमएच 23 वाय- 250) संदेश गव्हार याला जोराची धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या संदेशचा उपचाराला घेऊन जाताना वाटेतच मृत्यू झाला.

या प्रकाराची माहिती समजताच नातेवाईक व संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. संदेशचा मृतदेह महामार्गावर ठेवून हे आंदोलन सुरू करण्यात आले. या महामार्गाच्या चौपदरीकरणावेळी या ठिकाणी भुयारी महामार्ग करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकवेळा निवेदनाद्वारे संबंधित कंपनीकडे केली होती. याशिवाय ग्रामपंचायतीने तीन वेळा ठराव घेऊन दिले होते. परंतु त्याची दखल घेतली नाही. महामार्ग ओलांडणे याठिकाणी धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी भुयारी मार्ग करावा, यासाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश मिळत नसल्याचे चित्र सायंकाळी सव्वासहापर्यंत होते. या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजुंची वाहतूक तासभरापासून ठप्प आहे. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास तहसीलदार सुजित नरहरे, पोलिस उपअधीक्षक मोतीचंद राठोड हे घटनास्थळी दाखल झाले होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

  • 'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.
  • शेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.
  • राजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.
Web Title: Rasta Roko Agitation on National Highway at Usmanabad