औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवारांसोबतच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

  • राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केल्या भावना 
  • अजित पवारांचा केला निषेध
  • पक्षाचा आदेश अंतिम 
  • भाजप सोबत जाण्याचा निर्णय खेदजनक 

औरंगाबाद - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार रात्रीतून भाजपसोबत गेले. त्यांनी गुपचूप उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. या राजकीय भूकंपानंतर सोशल मीडियामधून जोरदार टिकाटिपणी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना काय वाटतेय, हे जाणून घेतले असता आपण शरद पवारांसोबत आहोत, असा प्रातिनिधिक सूर या सर्वांच्या प्रतिक्रियामधून निघाला. 
  
मी शरद पवारांसोबतच

सतीश चव्हाण (आमदार) : मी, एका लग्नासाठी कर्नाटकामध्ये होतो; मात्र घटना-घडामोडीची माहिती मिळताच सहाशे किलोमीटरचा प्रवास करीत वाय. बी. सेंटरमध्ये पोचलो. पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीत सहभाग नोंदवला. काही झाले तरी मी, शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच असेल. आता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह आमदारांसोबतच आहे. 
 
पक्षाचा आदेश अंतिम 
कैलास पाटील (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस) ः
मोठ्या परिश्रमाने राज्यात 54 आमदार निवडून आणले. आम्हाला पक्षाचा आदेश, निर्णय अंतिम आहे. जे काही वातावरण निर्माण झाले, ते दोन दिवसांत स्पष्ट होईल. आपण पक्षासोबतच असून, सर्व महत्त्वाच्या बैठकांमध्ये सहभागी आहोत.  

हेही वाचा - अजित पवारांनी पद बदलले, पण पक्ष तोच ठेवला

अत्यंत घाणेरडे राजकारण 
सुधाकर सोनवणे (माजी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस) ः
अजित पवारांचे अस्तित्वच शरद पवारांमुळे आहे. असे असताना अजित पवारांनी अत्यंत घाणेरडे राजकारण केले आहे. त्यांचे स्वत:चे काय अस्तित्व आहे? रात्रीतून भाजपसोबत जात शपथविधीही उरकून घेतला. त्यांनी पाठीत खंजीर खुपसायला नको होता. आम्ही आजन्म शरद पवारच यांच्यासोबतच आहोत
आणि राहणार. 
 

संबंधित बातमी - उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत साधला संवाद

धक्काच बसला 
विक्रम काळे (आमदार) ः
महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार दिवसरात्र एक करीत आहेत. मी शुक्रवारी (ता.22) दिवसभर अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत होतो. एका विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी मुंबई बाहेर आलो आणि सकाळी त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे कळाले. यामुळे धक्‍काच बसला.
आपण सदैव शरद पवारांसोबतच आहोत. रविवारी (ता.24) अजित पवारांना भेटून त्यांनी पक्षासोबत राहण्यासाठी विनंती करणार आहे. 
  
राज्यातील युवक शरद पवारांसोबत 
भाऊसाहेब तरमळे (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस) ः
पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कठोर परिश्रम घेत राज्य पिंजून काढले. त्यांच्या करिष्मामुळे चांगले दिवस आले. तमाम युवक मंडळींना त्यांनी साद दिली. युवकांनीदेखील मतदानातून तुमच्याच सोबत आहोत, हे दाखवून दिले. महाराष्ट्रातील युवावर्ग आजही त्यांच्यासोबतच आहे आणि राहील. असे प्रसंग त्यांनी पाहिलेच नाही तर पलटून लावले आहेत. त्यामुळे आम्ही शरद पवार यांच्याच सोबत आहोत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reactions of NCP Leaders in Aurangabad dist