यशोदा माता पुरस्कार सोहळ्यात काय म्हणाले पालकमंत्री अशोक चव्हाण - वाचा 

नवनाथ येवले
Sunday, 8 March 2020

ग्रामपंचायतीपासून मंत्रालय व प्रशासन सेवेत महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार प्राप्त आहेत. महिलांच्या सबलीकरण व सक्षमीकरणासाठी महाविकास आघाडी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी (ता. आठ) केले.

नांदेड : महापुरुष, महानायिका व समाजसुधारकांचे महिला अधिकारांसाठी मोठे योगदान आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा पाया रचणाऱ्या महाराष्ट्राने देशाला प्रेरणा दिली. काँग्रेसच्या शासन काळात महिलांना पन्नास टक्के आरक्षण लागू करण्यात आले. त्यामुळे आज ग्रामपंचायतीपासून मंत्रालय व प्रशासन सेवेत महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार प्राप्त आहेत. महिलांच्या सबलीकरण व सक्षमीकरणासाठी महाविकास आघाडी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी (ता. आठ) केले.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे जागतिक महिला दिनाच्या औचित्याने रविवारी (ता. आठ) भक्ती लाँन्स येथे पालकमंत्री चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत यशोदा माता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

 हेही वाचामहापालिकेचा ६४५ कोटींचा अर्थसंकल्प, कोणत्या ते वाचा...

जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर अध्यक्षस्थानी होत्या. महिला व बालकल्याण सभापती सुशीला हणमंत पाटील बेटमोगरेकर यांच्या आयोजनात या कार्यक्रमात अंगणवाडीस्तरावर उल्लेखनीय काम करणाऱ्या एकूण ८० पर्यवेक्षीका, सेविका, मदतनीस यांना यशोदा माता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, महापौर दीक्षा धबाले, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप बेटमोगरेकर, एनएसएसवायचे जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, सभापती रामराव नाईक, संजय बेळगे, बाळासाहेब रावणगावकर, सदस्य प्रकाश भोसीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. शिंगणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मरगळ झटकून कामाला लागा
पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, जिल्हा परिषदेस मिनी मंत्रालयाचा दर्जा आहे. जिल्हा नियोजन समितीचा चाळीस टक्के निधी अखर्चीत राहतो, ही चिंतेची बाब आहे. आगामी काळात निधीची कमतरता भासू देणार नाही, मागची मरगळ झटकून कामाला लागावे. जिल्ह्यातील सर्व रस्ते महामार्गांना जोडण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. बांधकाम समितीच्या सभापतींनी कंत्राटदारांवर निगराणी ठेवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. शिंगणे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संतोष देवराये यांनी सुत्रसंचलन केले तर माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी आभार मानले.

जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा
अधिकारी बदलून जात असताना जिल्ह्यातील वाळू माफीयांची गाऱ्हाणी करतो. कर्तव्य बजावत असताना त्यांना कोणी रोखले का? अधिकाराचा वापर करुन अवैद्य धंदेवाल्यांना डांबायचे सोडून आता जाताना ओरड करायची, हे ठीक नाही. चांगले काम करणाऱ्यांची प्रशंसा केली जाईल. मात्र, कर्तव्यात कसूर केल्यास रामराम ठोकला जाईल, असे म्हणत जिल्ह्यातील अवैद्य धंदे बंद करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी यंत्रणेला दिल्या.

येथे क्लिक करा -महिलांना का वाटते असुरक्षीत- काय म्हणाल्या छाया बैस-चंदेल

राजूरकरांकडून शिवसेनेचा समाचार
कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतील नावावरुन निर्माण झालेल्या वादावर जिल्हा परिषद आमची, महाविकास आघाडी आमचीच. काय तर निमंत्रण पत्रिकेत नाव नाही टाकलं, नाही टाकलं आणि टाकणारही नाही, काय करायचं ते करा, असे म्हणत आमदार श्री. राजुरकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा समाचार घेतला. निमंत्रण पत्रिकेतील नावावरुन निर्माण झालेल्या वादावर जशास तसे उतरा, काही होत नाही, मी आहे असे म्हणत आमदार श्री. राजुरकर यांची त्यांनी पाठराखण केली. 

शिवसेनेचा कार्यक्रमवार बहिष्कार
यशोदा माता पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत नावाबाबत प्रोटोकॉल चा मुद्दा पुढे सारत शिवसेनेकडून कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे जाहिर करण्यात आले होते. त्यानुसार कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा परिषद उपाध्यक्षा पदमा सतपलवार यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्यांची अनुपस्थिती होती.     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read what Guardian Minister Ashok Chavan said at the Yashoda Mata Awards Ceremony