Video : कोरोना मला स्पर्शही करू शकत नाही, असं कोण म्हणतंय ते वाचाच

नवनाथ येवले
Friday, 27 March 2020

 शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भररस्त्यात सुरक्षेच्या खबरदारी शिवाय शीर्षासन, मयुरासन, पद्मासन करताना एक गृहस्थ दिसून आला. कोरोनाच्या धास्तीने निर्मणुष्य रस्त्यावर चक्क योगासने करणाऱ्या या व्यक्तीने ‘मला सर्दी खोकला नाही, तर कोरोना स्पर्शही करु शकणार नाही’ असा दावा केला आहे. 

नांदेड: जगभरात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातल्याने संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. खबरदारीसाठी प्रत्येक नागरिक घरात बसुन कोरोनाशी दोन हात करत आहे. लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक खरेदीसाठी बाहेर पडणारा व्यक्ती सुरक्षेची खबरदारी घेत आहे. मात्र, शुक्रवारी (ता.२७ मार्च २०२०) शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भररस्त्यात सुरक्षेच्या खबरदारी शिवाय शीर्षासन, मयुरासन, पद्मासन करताना एक गृहस्थ दिसून आला. कोरोनाच्या धास्तीने निर्मणुष्य रस्त्यावर चक्क योगासने करणाऱ्या या व्यक्तीने ‘मला सर्दी खोकला नाही, तर कोरोना स्पर्शही करु शकणार नाही’ असा दावा केला आहे. 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे नेहमीच वर्दळीने गजबजलेले रस्ते निर्मणुष्य आहेत. जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी तुरळक एखादी व्यक्ती तसेच बाहेर पडणारे नागरीक सुरक्षेच्यादृष्टीने खबरदारी बाळगताना दिसून येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी झाडाच्या सावलीत एक पन्नाशीतला गृहस्थ शीर्षासन करताना दिसून आला. लॉकडाऊनमुळे सर्वत्र संचारबंदी असताना आंदोलन, ते ही या अवस्थेत, असे कोणते आंदोलन असावे! अशा शंका उपस्थित करत ये-जा करणारांची नजर त्यांच्याकडे रोखत होती. 

हेही वाचागुड न्युज : ५५ जणांचे अहवाल आले निगेटीव्ह

पुढचा प्रवासही लॉकडाऊन 
झारखंड राज्यातील मुनिंद्र भगत यांनी गुजरातमधील अहमदाबाद रेल्वेस्थानकावर शनिवारी (ता.२१ मार्च २०२०) तिरुपतीला जाण्यासाठी गंगानगर रेल्वे पकडली होती.  रविवारी (ता.२२ मार्च २०२०) ते नांदेडला उतरले. अन  जनता कर्फ्युमुळे त्यांचा प्रवास नांदेडपर्यंतच येऊन थांबला. त्यामुळे मुनिंद्र भगत यांनी सोबतचा बिछाना घेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाडाच्या अश्रयाला मुक्काम थाटला. बालपणापासून योगासनाचा छंद जोपासणाऱ्या श्री. भगत यांच्या शीर्षासन, पद्मासन, मयुरासनाने लक्ष वेधले. 

येथे क्लिक कराvideo - ‘लॉकडाऊन समजून घेना भाऊ...उगाच त्रास नको देऊ’

योगासने केल्यास फायदा 
शीर्षासन केल्याने पाचनक्रियेत लाभ होतो. शीर्षासन नियमित केल्याने मस्तिष्कमध्ये रक्त प्रवाह सुरळीत होतो व वाढतो. स्मरणशक्ती वाढते, तसेच कफ होत नाही. पद्मासन सर्व शारीरिक व्याधींचा नाश करते. मयुरासनाने वक्षस्थळ, फुप्फुस, बरगज्या व प्लिहा मजबूत होतात. पाठीच्या कण्यासाठीही हे आसन लाभदायी आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान ही तीन योगासने करण्याचे अवाहन त्यांनी केले. मला साधा सर्दी खोकलाही नाही; तर कोरोना खुप दुरची गोष्ट आहे. योगासनाने कोरोना स्पर्शही करू शकत नसल्याचा दावा मुनिंद्र भगत यांनी केला. 

प्रवासाची चिंता नाही 
दर्शनसाठी तिरुपतीला जाण्यासाठी कुठलेही साधन नसल्याने तुर्तास मुक्कामाशिवाय पर्याय नाही. शहरात कुठे हॉटेल सुरू नसले तरी श्री. सचखडं हुजूर साहेब गुद्वारा येथील लंगर सेवेचा लाभ मिळत असल्याने पुढील प्रवासाची चिंता नाही. लॉकडाऊननंतर तिरुपती दर्शनासाठी जाणार आहे. 
-  मुनिंद्र भगत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... read who is saying that Corona can't even touch me Nanded News