किती जणांना माहीत आहे गुढीपाडव्याचे कडुलिंबाशी नाते... 

टीम ई सकाळ
Friday, 20 March 2020

साडेतीन मुहूर्तांपैकी एक उत्तम मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा. गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्यात येतो. भारतीय संस्कृतीमध्ये जसे सण -उत्सवांच्या परंपरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्याचप्रमाणे कालचक्रानुसार ऋतुबदलांचेही परिणाम अशा सणांवर दिसून येतात. याच सणाचे कडुलिंबाशी फार घनिष्ठ नाते आहे. पाहूया ते काय... 

फाल्गुनात झाडांची पानगळ होते आणि चैत्राच्या सुरवातीला झाडांना नवीन पालवी फुटू लागते. सृष्टीला नवा बहर येतो. धरती हिरव्या शालूने नटलेली दिसते. असा हा आनंददायी ऋतुबदल चैत्र महिन्यात घडतो. म्हणून तर अशा नव्या पालवीला चैत्र पालवी म्हणतात. वसंत ऋतूचे आगमन आणि नव्या वर्षाचा प्रारंभ चैत्रपाडवा साजरा करतात.

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

दारोदारी गुढ्या उभारणे हे पाडव्याचे वैशिष्ट्य आहे. या मागचा वैज्ञानिक दृष्टीकोन हाच की, वातावरणातल्या चांगल्या लहरी आपल्या दारात येतात. या दिवशी गोड पक्वान्न करण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर कडुलिंबाची पाने खाण्याचीही परंपरा आहे. कडुलिंब आरोग्याला चांगले असते. या महिन्यात भरपूर उकाडा असतो. कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते.

गुढी पाडवा हा सण निसर्गाशी नाते सांगणारा सण आहे. त्यामुळे गुढीला कडुनिंबांच्या कोवळ्या पानांची डहाळी साखरगाठीसह बांधून ती दारामध्ये उभी करतात. यामागे मोठा आयुर्वेदीय दृष्टिकोन आहे. त्यानुसार फक्त गुढीला निंबाची डहाळी बांधून काम संपत नाही, तर काय काय करतात पाहा... 

चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात गुढीपाडवा...

  • कडुनिंबाची पाने, मिरे, हिंग, सैंधव, चिंच, ओवा, गूळ यांचे मिश्रण करून प्रत्येकाने थोडे थोडे खावे. यामुळे शरीराची अंतर्गत शुद्धी होते.
  • चंदनाचा टिळा लावावा. त्यामुळे उष्णतेची तीव्रता कमी होणेस मदत होते.
  • साखरेच्या गाठी खाव्यात. यामुळे शरीरातील रक्तामधील उष्णता कमी होते.
  • श्रीखंड भोजनात ठेवल्यामुळे दमा, सुका कफ, कुपोषण नाहीसे होऊन आरोग्य छान राहण्यास मदत होते.

आजच्या धकाधकीच्या यांत्रिक बनलेल्या जीवनात सणांचे महत्त्व केवळ आध्यात्मिक नाही, हे लोकांपर्यंत पोचणे गरजेचे झाले आहे. त्यामध्ये आयुर्वेद तसेच स्थळानुसार व काळानुसार परंपरा यांचा संबंध नक्की आहे, असे मत आयुर्वेदाचे अभ्यासक आणि तज्ज्ञ डॉ. राहुल लोणीकर यांनी व्यक्त केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reason To Celebrate Gudhipadwa With Neem In India