संतापजनक : प्रसूती करण्यास नकार, बाळही दगावले

जगन्नाथ पुरी
शनिवार, 30 मे 2020

हिंगोली जिल्ह्यातील खुडज येथील आरोग्य उपकेंद्रात प्रसुतीसाठी गेलेल्या एका महिलेची तपासणी न करता घरी पाठविले. त्यानंतर गरोदर मातेची घरीच प्रसुती झाली. मात्र उपचाराअभावी बाळ दगावले असल्याचा आरोप मृत बाळाच्या मातेने केला आहे. 

सेनगाव (जि. हिंगोली) : तालुक्‍यातील खुडज येथील आरोग्य उपकेंद्रात प्रसुतीसाठी गेलेल्या एका महिलेची तपासणी न करता घरी पाठविले. त्यानंतर गरोदर मातेची घरीच प्रसूती झाली. मात्र उपचाराअभावी बाळ दगावले असल्याचा आरोप मृत बाळाच्या मातेने केला आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकाऱ्याने दिले आहेत. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे मातेने तक्रार दाखल केली आहे. 

खुडज (ता. सेनगाव) येथील मथुराबाई परमेश्वर गायकवाड या गरोदर मातेला प्रसुतीसाठी सोमवारी (ता.२५) रात्री अकरा वाजता पती परमेश्वर गायकवाड यांनी खुडज येथील आरोग्य उपकेंद्रात दाखल केले होते. 

हेही वाचाकेळी पिकाला लॉकडाउननंतर उन्हाचा फटका 

सकाळी सात वाजता प्रसूती

मात्र, तेथे तपासणी न करताच तेथील कर्मचाऱ्यांनी घरी पाठविले. या वेळी रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध करून दिली नाही. खासगी वाहन देखील लॉकडाउनमुळे मिळाले नाही. त्‍यामुळे मथुराबाई गायकवाड ह्या घरी गेल्या. रात्रभर वेदना होत होत्या. सकाळी सात वाजता प्रसूती होवून त्यांना कन्यारत्‍न जन्मले.

तक्रारीनंतर रुग्णवाहिका पाठविली

 मात्र, बाळ रडत नसल्याने पती परमेश्वर गायकवाड व पंचायत समिती सदस्य सुनिल मुंदडा यांना घेऊन परत आरोग्य उपकेंद्रात आल्या. परंतु, याही वेळी मदत मिळाली नाही. या वेळी श्री. मुंदडा यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर त्‍यांनी रुग्णवाहिका पाठवून दिली. 

कारवाई करण्याची मागणी

उपकेंद्रातील कर्मचारी सोबत देऊन जिल्‍हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, बाळ मयत असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. खुडज येथील उपकेंद्रात उपचार झाले असते बाळ वाचले असते. त्‍यामुळे कर्मचाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी मथुराबाई गायकवाड यांनी केली आहे. तसे निवेदन आरोग्य विभागाला दिले आहे.

अहवाल सादर करण्याचे आदेश

मथुराबाई गायकवाड यांच्या प्रसूतीसंदर्भात चौकशी पथक नेमून तीन दिवसांत अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे साखरा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्‍यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
- डॉ. सतीश रुणवाल, तालुका आरोग्य अधिकारी

 

येथे क्लिक करा Covid-19 : वसमतमध्ये चौघे बाधित, हिंगोली जिल्ह्यात नवे पाच रुग्ण 

गरोदर मातेस मारहाणीची घटना 

हट्टा : मुंबईहून गावात आलेल्या व स्वतःच्या शेतात क्वारंटाइन झालेल्या मजुरांना (ग्रामस्थ) शेतात थांबा, असे म्हणल्याने झालेल्या वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना हट्टा (ता. वसमत) येथे बुधवारी (ता. २७) घडली होती. यात एका गरोदर महिलेच्या पोटात लाथ मारल्याने महिलेला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करावे लागले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Refuse Maternity Of The Woman, Baby Was Also Dead Hingoli News