esakal | केळी पिकाला लॉकडाउननंतर उन्हाचा फटका

बोलून बातमी शोधा

hingoli photo

वारंगा फाटा (ता. कळमनुरी) परिसरातील केळी पिकातील ओलावा उन्हामुळे कमी होत असल्याने पाने जळून जात असून उत्पादनात घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. यामुळे आर्थिक नुकसान होत असून झालेला खर्चही निघत नसल्याने चित्र आहे.

केळी पिकाला लॉकडाउननंतर उन्हाचा फटका
sakal_logo
By
मुजाहेद सिद्दीकी

वारंगा फाटा (जि. हिंगोली) : जिल्ह्यात काही दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ होत असून तापमान ४० ते ४४ अंशांवर राहात आहे. त्यामुळे नागरिक घामाघूम होत असून याचा फटका पिकांनाही बसत आहे. वारंगा फाटा (ता. कळमनुरी) परिसरातील केळी पिकातील ओलावा कमी होत असल्याने पाने जळून जात असून उत्पादनात घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

कळमनुरी तालुक्‍यातील वारंगा फाटा परिसरातून इसापूर धरणाचा कालवा जातो. या कालव्यावर हजारो हेक्‍टर जमीन सिंचनाखाली आली आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी ऊस, केळी, हळद ही नगदी पिके घेतात. तसेच उन्हाळ्यातदेखील कालव्याला पाणी सोडल्यास भुईमुगाचे पीक घेतले जाते.

हेही वाचा तलाठी दुसऱ्यांदा अडकला एसीबीच्या जाळ्यात, कुठे? ते वाचाच

मोठ्या प्रमाणात केळीची लागवड 

 वारंगा फाटा गावासह डोंगरकडा, सुकळीवीर, जामगव्हाण, जवळा पांचाळ, दिग्रस बुद्रुक, दांडेगाव, हिवरा, वरुड, रेडगाव, वडगाव या गावांत मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. उत्तम नगदी पीक म्हणून या बारमाही पिकाकडे शेतकरी पाहतात. 

तापमानामुळे केळी पिकाचे नुकसान

मागील वर्षी केळीला चांगल्याप्रकारे भाव मिळाल्यामुळे या वर्षीदेखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली आहे. भाव चांगला मिळणार या आशेवर केळी संगोपनावर मोठा खर्चही करण्यात आला आहे. मात्र, तापमानात झालेली वाढ केळी पिकाच्या मुळावर आली आहे. कधी नव्हे ते वाढलेल्या तापमानामुळे केळी पिकाचे नुकसान होत आहे. 

२० ते ३० टक्के घट होण्याची भीती

दरवर्षी मे महिन्यातील तापमान ३८ ते ४० अंशांवर असते. या वर्षी मात्र ते ४५ अंशांपर्यंत गेले आहे. त्यामुळे केळी पीक चांगलेच अडचणीत सापडले असून पाने जळून जात आहेत. असेच तापमान राहिल्यास उत्पादनात २० ते ३० टक्के घट होण्याची भीती उत्‍पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.

येथे क्लिक कराहिंगोली जिल्ह्यात आढळले चार मानवी सांगाडे

२० ते ३० टक्के घट होण्याची भीती

केळीचे पीक उन्हाला हळवे असून वाढलेल्या तापमानामुळे त्याचे विपरित जाणवत आहेत. मागील वर्षी एप्रिल ते मे महिन्यात केळीला चौदाशे ते आठराशे रुपये क्विंटलचा दर मिळत होता. या वर्षी लॉकडाउनमुळे तो २५० ते पाचशे रुपये प्रतिक्विंटलवर आला आहे. यात लागवड खर्च निघणेही अवघड झाले आहे. त्यात तापमानात वाढ होत असल्याने पिकावर परिणाम होत आहे.
-दिगंबर गोरे, केळी उत्‍पादक

पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग

औंढा नागनाथ : खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांनी लॉकडाउनच्या काळातील मरगळ झटकत पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरवात केली आहे. बैलजोडी व ट्रॅक्‍टरच्या मदतीने ही कामे केली जात आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने सकाळीच शेतकरी शेतातील कामे करीत आहेत. या वर्षी सोयाबीनची पेरणी अधिक केली जाणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.