esakal | शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ‘आरटीओ’चे भूत, लातूर जिल्ह्यात ओव्हरलोडिंगच्या नावाखाली लूट
sakal

बोलून बातमी शोधा

1farmer_20in_20akola

कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात कोरोनाचा फटकाही शेतकऱ्यांना बसला आहे. अशा परिस्थिती हातात आलेला शेतमाल तो बाजारात घेऊन येत आहे.

शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ‘आरटीओ’चे भूत, लातूर जिल्ह्यात ओव्हरलोडिंगच्या नावाखाली लूट

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात कोरोनाचा फटकाही शेतकऱ्यांना बसला आहे. अशा परिस्थिती हातात आलेला शेतमाल तो बाजारात घेऊन येत आहे. वाटेतच त्यांना आरटीओच्या पथकाचा सामना करावा लागत आहे. ओव्हरलोडिंगच्या नावाखाली लूट होत आहे. २५ हजार ते लाखापर्यंतचा दंड आकारून हे पथक शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे. लाखो रुपयांची कमाई करणाऱ्या वाळू माफियांकडे मात्र या पथकाकडून अभय दिले जात आहे.


गेल्या दोन तीन वर्षांपासून जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागला. यावर्षी जून, जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाला. त्याचा परिणाम साडे चार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. हाताशी चांगले पीक येईल असे वाटत असताना परतीच्या पावसाने मोठा फटका बसला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीझाल्याने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. हाताशी आलेले पिकातून काही मिळेल या आशेवर सध्या शेतकरी आहे. यातून रब्बीची पेरणी, खर्चही त्याला भागवायचा आहे. सध्या लग्नसराईचेही दिवस आहेत.

त्यामुळे शेतकरी आपला शेतमाल त्यात सोयाबीन मोठ्या प्रमाणात अडत बाजारात आणत आहेत. एकट्या शेतकऱ्याला बाजारात आणणे वाहतुकीच्या दृष्टीने परवडत नाही. त्यामुळे काही शेतकरी एकत्र येऊन छोटा हत्ती, टेंपो, ट्रॅक्टर अशा वाहनातून आपला माल बाजारात आणत आहेत. पण, त्यांना गेल्या महिन्यापासून आरटीओच्या पथकाचा सामना करावा लागत आहे. मार्चपासून ते ऑगस्टपर्यंत या पथकाच्या हातात काहीही पडलेले नाही. त्यांची दंडात्मक कमाई थांबली आहे. त्यामुळे आता या पथकाकडून शेतकरी टार्गेट केला जात आहेत.

हे पथक शहरात येणाऱ्या रस्त्यांवर घिरट्या मारत फिरत आहे. शेतमालाच्या वाहनाला अडविले जात आहे. प्रत्येक कागदपत्रांची तपासणी केली जाते. काही आढळलेच नाही व ‘बोलणी फिसकटल्यानंतर’ ओव्हरलोडिंगच्या नावाखाली मात्र २५ हजारांपासून ते लाखापर्यंतचा दंड केला जात आहे. वाहने अडवून ठेवली जात आहेत. असल्या कारवाईमुळे शेतकरी, वाहनधारक त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात रोज इतर हजारो वाहने ओव्हरलोडिंगचे रस्त्यावरून धावत आहेत. त्यात शेकडो वाहने तर वाळूची आहेत. त्यांना मात्र या पथकाकडून अभय दिले जात आहे.

कृषीमंत्री, पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज
आरटीओच्या पथकाकडून ओव्हलोडिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. मोठ्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. यात मोठा फटकाही त्यांना बसत आहे. हे लक्षात घेऊन कृषीमंत्री दादा भुसे आणि पालकमंत्री अमित देशमुख यांनी या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यांनी आरटीओ तसेच पोलिस प्रशासनाला सूचना दिल्या तर शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही.


आमच्या पथकाकडून ओव्हरलोडिंगच्या वाहनावर सातत्याने कारवाई केली जाते. ही कारवाई दंडात्मक असते. यात कोणावरही जाणीवपूर्वक कारवाई केली जात नाही.
- विजय पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

Edited - Ganesh Pitekar

loading image
go to top