नियमित कर भरणा करणाऱ्यांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

स्वातंत्र्य दिनानिमित्त उमरगा तालुक्‍यातील भुसणी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यासह विविध करांचा नियमित भरणा करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

उमरगा (जि. उस्मानाबाद) : स्वातंत्र्य दिनानिमित्त तालुक्‍यातील भुसणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली; तसेच विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यासह ग्रामपंचायतीच्या विविध करांचा नियमित भरणा करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

 
भुसणी येथे गुरुवारी (ता.15) सकाळी सात वाजता सरपंच महेश हिरमुखे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर दहा वाजता घेण्यात आलेल्या ग्रामसभेत नियमित कर भरणा करणाऱ्या ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेले श्रीमंत पाटील, संतोष हिरमुखे, विजयकुमार हिरमुखे, जिलानी पटेल, सागर मंडले, रामलिंग पुराणे (मुरूम), नितीन बिरादार यांच्यासह सुंदर व स्वच्छ शाळा उपक्रम राबविलेले मुख्याध्यापक एम. जी. देवकर व शिक्षक, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत केल्याबद्दल भागीरथी बिराजदार यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सरपंच हिरमुखे यांनी विविध विकासकामांच्या निधीबाबत माहिती सांगितली. विकासकामासाठी कुठलीही अडचण येणार नाही. येणाऱ्या काळात स्मार्ट भुसणी म्हणून ओळख निर्माण करूया, असा निर्धार सरपंच श्री. हिरमुखे यांनी केला. ग्रामसेवक शरद बलसुरे, कृषी सहायक श्री. जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य धनराज हिरमुखे, विकास संस्थेचे अध्यक्ष सायबण्णा हिरमुखे, उपसरपंच प्रशांत गायकवाड, पोलिस पाटील गुलाब हिरमुखे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष श्रीमंत पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र व्हनाजे, माजी सरपंच सुभाष बिराजदार, ग्रामपंचायत सदस्य शिवानंद कलशेट्टी, वीरभद्रया स्वामी, विजयकुमार कौलकर, शाबुद्दीन ग्याराघरवाले, चंद्रकांत गुरव, प्रतिभा सगर आदींची उपस्थिती होती. 
विकासकामांसाठी 40 लाख मंजूर 
विद्यासागर हिरमुखे, संजय हिरमुखे, अनिल मनूरकर यांच्या नेतृत्वाखाली सरपंच हिरमुखे यांनी मुंबई येथे मंत्रालयात जाऊन विविध कामांसाठी पाठपुरावा केला होता. अण्णा भाऊ साठे वस्तीत रस्ते व गटार कामासाठी 10 लाख, मागासवर्गीय स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ताकामासाठी 15 लाख, कन्हैयानगर येथे रस्ता व गटार बांधकामासाठी 10 लाख, सिद्धार्थनगरमध्ये पथदिवे बसविण्यासाठी पाच लाख मंजूर करण्यात आले आहेत. 
----- 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Regular tax payment