जालना, बुलडाणा, परभणी जिल्ह्यांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीच्या स्वाक्षऱ्या

उमेश वाघमारे
Saturday, 6 February 2021

उस्मानाबाद, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या वर्षापासून सुरू होतील.

जालना : राज्यात किती वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी द्यायची यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीअंती धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी (ता.पाच) येथे पत्रकार परिषदेत दिली.
टोपे म्हणाले, जालना, बुलडाणा, परभणी जिल्ह्यांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. मी मंत्री झाल्यानंतर उस्मानाबाद, रायगड, सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास प्रत्यक्ष मान्यता दिली आहे. उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. उस्मानाबाद, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या वर्षापासून सुरू होतील. हिंगोली, गडचिरोली जिल्हेही असे महाविद्यालय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

...अशा जिल्ह्यांनी थोडे थांबावे
एका ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय उभारायचे झाल्यास सुमारे सातशे कोटी रुपये द्यावे लागतात. अर्थसंकल्पात एवढी आर्थिक तरतूद करणे शक्य नाही. त्यामुळे जवळ वैद्यकीय महाविद्यालय आहे, अशा जिल्ह्यांनी थोडे थांबावे, जिल्हा रुग्णालयांत अधिक सुविधा द्याव्यात, असा विचार सुरू आहे. मात्र, यासंदर्भात नेमका काय निर्णय घ्यायचा, मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव कधी ठेवायचे आदींवर चर्चेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. त्यानंतर राज्यात किती नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करावीत, याचा धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असेही टोपे म्हणाले.

मराठवाड्याच्या आणखी बातम्या वाचा

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी
राज्यात पहिल्या टप्प्यात साडेचार लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यात दरदिवशी पन्नास हजारांपेक्षा अधिक जणांना लस दिली जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची तयारी सुरू आहे. महसूल, पोलिस, नगरपालिका, महापालिकांतील स्वच्छता कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जालना जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनंतर महसूल, पोलिस, नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना लस द्यायला सुरवात केल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

 

Edited - Ganesh Pitekar

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rejesh Tope Said, Medical Collages Sanctioned By Singnatur Jalna Latest News