एमआयडीसीतील उद्योजकांना मिळाला दिलासा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

मांजरा धरणात अत्यल्प पाणीसाठा राहिल्याने गेल्या काही महिन्यांपासून येथील एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर तो अत्यल्प प्रमाणात सुरू करण्यात आला. आता परतीच्या पावसामुळे धरणात पाणी आल्याने आता एमआयडीसीला प्रतिदिन सहा दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे एमआयडीसीतील उद्योजकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. 

लातूर ः मांजरा धरणात अत्यल्प पाणीसाठा राहिल्याने गेल्या काही महिन्यांपासून येथील एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर तो अत्यल्प प्रमाणात सुरू करण्यात आला. आता परतीच्या पावसामुळे धरणात पाणी आल्याने आता एमआयडीसीला प्रतिदिन सहा दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे एमआयडीसीतील उद्योजकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. 

मांजरा धरणात यावर्षी पावसाळ्याच्या चारही महिन्यांत पाणीच आले नव्हते. त्यामुळे शहराला पंधरा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. लातूर एमआयडीसीला मांजरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो; परंतु मांजरा धरणातील पाणीसाठा अत्यल्प झाल्याने एमआयडीसीला प्रतिदिन दोन दशलक्ष लिटर पाणीपुरवठा सध्या केला जात होता.

परतीच्या पावसामुळे मांजरा धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली असून, एमआयडीसीने प्रतिदिन दहा दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रशासनाला केली होती, त्या मागणीवर टंचाई आढावा बैठकीत चर्चा होऊन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लातूर एमआयडीसीला प्रतिदिन सहा दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करावा अशा सूचना जलसंपदा विभागाला दिल्या आहेत.

लातूर एमआयडीसीचे मांजरा धरणातील पाणी आरक्षण हे प्रतिदिन बारा दशलक्ष लिटरचे आहे. आता त्यांना प्रतिदिन सहा दशलक्ष लिटर पाणी मिळणार असल्याने उद्योजकांना थोडा दिलासा मिळाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relief for entrepreneurs at MIDC