कंधारच्या नगराध्यक्षांना पदावरून हटवा

फोटो
फोटो

नांदेड : कंधार नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा शोभा नळगे यांनी विकासकामांना अडथळा आणला, तसेच नगरपालिकेच्या प्रशासकीय व कायदेशीर हिताला बाधा पोचविल्याचे कारण समोर करून खासदार प्रताप पाटील चिखलीकर समर्थक उपनगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांनी सोमवारी (ता. १६) जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे धाव घेत त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली.

कंधार नगरपालिकेची निवडणूक ता. १८ डिसेंबर २०१६ मध्ये झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे अरविंद नळगे आणि तत्कालीन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत झाली होती. यात काँग्रेसच्या चार नगरसेवकांसह शोभा नळगे या थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवडून आल्या, तर चिखलीकर यांच्या गटाचे सर्वाधिक दहा नगरसेवक निवडून आले. दोन अपक्ष नगरसेवकही यात निवडले.


कामे मर्जीतील ठेकेदारांना


परंतु, नगरपालिकेत बहुमत एका पक्षाचे, तर नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा, अशी परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, मागील तीन वर्षांत नगराध्यक्षांनी प्रशासकीय व न्यायालयीन कामात हस्तक्षेप करून पालिकेच्या आर्थिक व कायदेशीर हिताला बाधा पोचविण्याचे काम केले. पालिकेचे कामे मर्जीतील ठेकेदारांना देण्यासाठी अटी व शर्ती बदलल्या. तसेच नियमानुसार व विहीत कालावधीत सभा घेतली नसल्याची तक्रार उपनगराध्यक्ष जफरोद्दिन बाहोद्दिन, गटनेते दीपक आवाळे, सुनील कांबळे, अनिता कदम, अनुराधा बोरलेपवार (अपक्ष), पारूबाई पवार, जानीबेगम हॉजीमिया कुरेशी, शेख अजमेरी शेख अब्दुल खादर व रजिया बेगम शेख अब्दुल खादर या नऊ नगरसेवकांनी सोमवारी (ता. १६) जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे केली.


नगरविकास मंत्री काय निर्णय घेतात? याकडे कंधारवासींयाचे लक्ष


या बाबत चौकशी करून नगराध्यक्षांना पदावरून हटविण्याचा आग्रह धरला आहे. यात शिवसेनेच्या वर्षा कुंटेवार व अरुण बोधनकर यांनी मात्र, काँग्रेसला साथ दिल्यामुळे ते आज उपस्थित नव्हते. खासदार प्रताप पाटील चिखलीकर समर्थकांनी नगराध्यक्षांच्या विरोधात दंड थोपटल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण भर हिवाळ्यात तापले आहे. दरम्यान, या बाबत जिल्हाधिकारी निर्धारित कालावधीत चौकशी करून राज्याच्या नगरविकास मंत्रालयाकडे अहवाल पाठवितात. यानंतर नगरविकास मंत्री या बाबत सुनावणी घेऊन निर्णय घेणे अपेक्षित आहे. बदलत्या राजकीय स्थित्यंतरात नगरविकास मंत्री काय निर्णय घेतात? याकडे कंधारवासींयाचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com