
येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार दत्तू शेवाळे, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी ,सय्यद खालेक, राजकुमार उंडगे, सय्यद अनिस, संतोष खिल्लारे, यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली
कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील १२५ ग्रामपंचायत सरपंच पदाकरिता अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी निघालेले आरक्षण कायम ठेवून ७९ ग्रामपंचायत करिता गुरुवार ता. २७ ला सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले यामध्ये ३५ ठिकाणी नागरीकांचा मागासप्रवर्ग तर ४५ ठिकाणी सर्वसाधारण गटासाठी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.
येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार दत्तू शेवाळे, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी ,सय्यद खालेक, राजकुमार उंडगे, सय्यद अनिस, संतोष खिल्लारे, यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये तालुक्यामधील निवडणूक झालेले १०९ ग्रामपंचायत सरपंच पद व पुढील काळात निवडणूक होणाऱ्या १६ ग्रामपंचायत अशा एकूण १२५ ग्रामपंचायत सरपंच पदाकरिता आरक्षण काढण्यात आले यामध्ये अनुसूचित जाती २१ व जमाती प्रवर्गासाठी सुटलेल्या २५ अशा एकूण ४६ ग्रामपंचायत सरपंच पदाचे काढण्यात आलेले आरक्षण कायम ठेवून चिठ्ठ्याद्वारे नागरीकांचा मागासप्रवर्ग गटासाठी ३४ ग्रामपंचायत सरपंच पदाची सोडत काढण्यात आली.
हेही वाचा - हिंगोली : बोल्डा येथे अज्ञात आजाराने दोनशे कोंबड्या दगावल्या
यामध्ये १७ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले. शिल्लक राहिलेल्या ४५ जागा सर्वसाधारण गटासाठी आरक्षित करण्यात आले यामध्ये २३ जागा महिलासाठी सोडण्यात आल्या सरपंच पदाचे आरक्षण काढताना मागील आरक्षणामध्ये नरवाडी, टव्हा, कोपरवाडी व तरोडा, या चार ग्रामपंचायतीच्या सरपंचपद आरक्षणामध्ये फेरबदल झाला आहे. सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असलेल्या नरवाडी व टव्हा आरक्षण सोडतीमध्ये नागरीकांचा मागास प्रवर्ग साठी आरक्षित झाल्या तर नागरीकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित असलेल्या कोपरवाडी व तरोडा ग्रामपंचायत सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाल्या आहेत.
शंभर टक्के आदिवासी वस्ती असलेल्या तालुक्यातील भुरक्याची वाडी, तेलंगवाडी व कवडा ग्रामपंचायत सरपंच पदाकरिता आरक्षणामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटासाठी आरक्षण काढण्यात आले आहे. वास्तविक पाहता या प्रवर्गाचा येथे एकही मतदार नसल्यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला आहे याशिवाय काही ठिकाणी आरक्षण निघालेल्या प्रवर्गाचा उमेदवार नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
संपादन - प्रल्हाद कांबळे