निवासी उपजिल्हाधिकारी लाचखोरीच्या जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

परभणी - मनोरंजन केंद्राच्या परवाना नूतनीकरणासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेणारे परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयातच सापळा रचून पथकाने सोमवारी ही कारवाई केली. 

पारवा (ता. परभणी) येथील एका सेवाभावी संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या मनोरंजन केंद्राच्या परवाना नूतनीकरणाचे प्रकरण निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्याकडे आले होते. त्यासाठी बोधवड यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती. नूतनीकरण केलेला परवाना याच कार्यालयातील निवृत्त शिपाई हसनोद्दीन शमशोद्दीन यांनी तक्रारदाराच्या घरी नेऊन दिला आणि तक्रारदाराकडून पन्नास हजार रुपयांचा धनादेश घेऊन तो बोधवड यांच्याकडे दिला. दरम्यानच्या काळात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यासंदर्भात कळविले होते. तक्रारीची शहानिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक एन. एम. बेंबडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा लावला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम घेऊन तक्रारदार दाखल झाला. जिल्हाधिकारी कार्यालयातील पेशकार शेख, इसरार शेख उस्मान यांनी पूर्वीचा धनादेश तक्रारदाराला परत देऊन पन्नास हजारांची रोकड स्वीकारली. तेथे बोधवड, शमशोद्दीन हेही उपस्थित होते. श्री. बेंबडे यांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले. बेंबडे यांच्यासह पोलिस निरीक्षक अनिल गव्हाणकर, दिनकर गावंडे, विवेकानंद भारती आदींनी ही कारवाई केली. 

Web Title: Resident Deputy Collector of bribery net