पोलिसांनी दिले त्याला डॉक्टरांच्या ताब्यात, कोरोना बाधितांच्या संपर्कात आला होता

Tabligi, Udgir News
Tabligi, Udgir News

उदगीर (जि.लातूर) ः  दिल्ली येथील कोरोनाग्रस्तांच्या सान्निध्यात आलेल्या एकाला उदगीर शहरातून अखेर बुधवारी (ता.एक) पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. त्यांनी आरोग्य विभागाकडे त्याला सुपूर्द केले आहे. दिल्ली येथील एका धार्मिक कार्यक्रमानंतर अनेक नागरिक कोरोना बाधित झाल्याचे उघडकीस आले आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक नागरिकाचा शोध घेतला जात आहे. अशा बाधित नागरिकांच्या संपर्कामध्ये लातुर जिल्ह्यातील बारा नागरिकांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे.

त्या व्यक्तींचा शोध जिल्हा प्रशासनाने सुरू केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातही कोरोनाचे लोन पसरण्याचा धोका वाढला आहे. त्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून अशा नागरिकांची शोध मोहिम गल्ली, गावात सुरु झाली आहे. हे सर्व नागरिक विविध तालुक्यांतील असल्याचे बोलले जात आहे.
यात उदगीर शहरातील शेल्हाळ रस्त्यावरील खतीब कॉलनी येथील एका नागरिकाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने कळवल्यानंतर रात्रीपासून पोलिसांनी आरोग्य विभागाच्या सोबतीने नागरिकाचा शोध सुरू केला होता. अखेर आज बुधवारी हा व्यक्ती सापडला असून या व्यक्तीस शहर पोलिसांनी पकडून आरोग्य विभागाच्या ताब्यात दिला आहे. येथील सामान्य रुग्णालयात या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर या व्यक्तीचे स्वॅब नमुने घेण्यासाठी त्यास लातूरला पाठवण्यात आले आहे. त्यानंतर त्यास क्वॉरंटाईन करायचे कि विलगीकरण करायचे हा निर्णय जिल्हा प्रशासन घेणार आहे अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.
--

वाचा ः लातूर जिल्हाधिकाऱ्यांचा एप्रिल फुल, मॉर्निंग वॉक करणारे सहा जण ताब्यात

तीस हजारांची लाच घेताना सरपंच, ग्रामसेवकास पकडले
अल्पसंख्याक वस्तीमध्ये केलेल्या कामाचे बिल अदा करण्यासाठी मंगळवारी (ता. ३१) हाळी (ता. उदगीर) येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी तीस हजारांची रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे. सरपंच, सरपंच पती व ग्रामसेवकांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक माणिक बेंद्रे यांनी दिलेली माहिती अशी, की हाळी येथील ग्रामपंचायतीअंतर्गत अल्पसंख्याक वस्तीमध्ये करण्यात आलेल्या विविध विकासकामांची देयके अदा करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांनी लाचेची मागणी केली.

याची संबंधितांनी लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीची शहानिशा करून मंगळवारी हाळी ग्रामपंचायत येथे दुपारी सापळा रचण्यात आला. संबंधित तक्रारदाराचे तीन लाख ६५ हजार रुपयांचे बिल होते. या बिलाचा धनादेश काढण्यासाठी सरपंच पाच टक्के व ग्रामसेवक पाच टक्के असे एकूण दहा टक्के लाचेच्या रकमेची मागणी केली होती. शेवटी तडजोडीअंती १५ हजार रुपये सरपंच व १५ हजार रुपये ग्रामसेवक यांना देण्याचे ठरले. तडजोडीत ठरल्याप्रमाणे प्रत्येकी पंधरा हजार रुपये सरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात आले. ती रक्कम त्यांनी स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना पकडले. यावेळी या पथकाने सरपंच प्रज्ञा कांबळे, ग्रामसेवक परशुराम गायकवाड व सरपंच पती दयानंद कांबळे या तिघांना ताब्यात घेतले आहे. या पथकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक बेंद्रे, पोलिस निरीक्षक कुमार दराडे, मोहन सुरवसे, रूपाली भोसले, शिवा कच्छवे, श्री. महाजन यांचा समावेश होता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com