esakal | पोटभर खिचडी खाऊ घालण्याचा संकल्प, कुठे आणि कसा ते वाचा... 
sakal

बोलून बातमी शोधा

khichadi

कळमनुरीत केशव नाईक यांचे गावाकडे पायी जाणाऱ्यांना नियमित खिचडीचे वाटप

पोटभर खिचडी खाऊ घालण्याचा संकल्प, कुठे आणि कसा ते वाचा... 

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्य व जिल्ह्याच्या सीमा बंद केल्यानंतर अडचणीत सापडलेल्या शेकडो निराधार व पादचारी परप्रांतीय नागरिकांना शक्य ती मदत करण्याच्या खासदार राजीव सातव यांच्या आवाहनानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य केशवराव नाईक यांनी निराधार व गावाकडे परतणाऱ्या नागरिकांना खिचडी वाटप सुरू केले आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले लॉक डाऊन पाहता स्थलांतरित झालेल्या मजूर व कामगारांना गावी परतण्याचे वेध लागले आहेत. शासनाकडून प्रत्येक नागरिकाला आहे तिथे थांबण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतरही आपापल्या गावाकडे परतणाऱ्या मजूर व कामगारांची संख्या मोठी आहे. मात्र, सद्यस्थितीत  सर्व वाहतूक व्यवस्था बंद झाल्यामुळे या मजुरांच्या अडचणीत भर पडली आहे.

हेही वाचा - ‘कोरोना’ रिलीफ फंडासाठी सरसावले मदतीचे हात

परप्रांतीय मजूर व कामगारांचा मोठा समावेश 
आपल्या गावी परतनेच बरे असे समजून शेकडोंच्या संख्येने असलेल्या मजूर व कामगारांनी आता पायी चालत आपले गाव गाठण्याचा प्रयत्न चालविला आहे. यामध्ये परप्रांतीय मजूर व कामगारांचा मोठा समावेश आहे. या पादचारी नागरिकांना पैसे हाताशी असूनही हॉटेल व इतर सर्व खाद्यपदार्थांची दुकाने बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

हेही वाचा - गहू काढणीसाठी मजूरांची जागा घेतली हार्वेस्‍टरने

बुधवारपासून उपक्रम सुरू 
गावांमधील निराधार व्यक्तीवर दोन वेळच्या जेवणाचीही झालेली आभाळ पाहता खासदार राजीव सातव यांनी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या सर्व नागरिकांना शक्य ती मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषद सदस्य केशव नाईक यांनी आपल्या शेतात दररोज ७५ किलोची खिचडी शिजवून खिचडी एका वाहनाद्वारे कळमनुरी-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर गावाकडे पाई परतणाऱ्या मजूर व कामगारांना वाटप केली आहे. निराधार व पादचारी असलेल्या प्रत्येकाला पोटभर खिचडी खाऊ घालण्याचा संकल्प करीत बुधवारपासून (ता.२५) हा उपक्रम नियमितपणे सुरू केला आहे.

शिजवलेल्या खिचडीचे वाटप
शहरातील निराधार व्यक्तींना शिजवलेली खिचडी वाटप करण्यात येत आहे. सोबतच आपल्या गावी पायी परतणाऱ्या परप्रांतातील युवक मजूर व कामगारांनाही त्यांनी जागोजागी थांबवून खिचडी वाटप करण्याचे कार्य हाती घेतले आहे. स्वतःच्या वाहनांमध्ये खिचडी घेऊन जागोजागी अडचणीत सापडलेल्या निराधार व गावाकडे परतणाऱ्या नागरिकांना त्यांनी पोटभर जेवू घालून दिलासा देण्याचा प्रयत्न चालवला आहे.

जागोजागी मदतीचे प्रयत्न सुरू 
लॉकडाउन असेपर्यंत समाजातील सर्व निराधार अडचणीत सापडलेल्या बाहेरगावच्या नागरिकांना खिचडी खाऊ घालण्याचा निर्धार श्री. नाईक यांनी केला आहे. केशव नाईक यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला खासदार ॲड. राजीव सातव यांनी पाठिंबा दिला आहे. पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी जागोजागी गरीब निराधार कुटुंबांना धान्य वाटप व जमेल त्या पद्धतीने मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र आहे.

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतला पुढाकार 
आजाराची पार्श्वभूमी सुरू असलेले लॉक डाऊन, जमावबंदी या परिस्थितीत समाजातील दीनदुबळ्या, रस्त्याच्या कडेला राहून छोटा-मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे व निराधार नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. या कुटुंबांना बंदच्या काळात शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न असून त्यादृष्टीने पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. - राजीव सातव, खासदार.